Bhosari : ‘इन्फ्रा दोन’च्या कामांमुळे भोसरी परिसरातील विद्युत सुविधा सक्षम होणार

एमपीसी न्यूज – भोसरी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. भोसरीचा परीसर कंपन्यांमुळेच मोठ्या प्रमाणात ओळखला जातो. कंपन्यांमुळे या भागातील लोकसंख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. कंपन्या अधिक सक्षम करण्यासठी त्यांना होणारा वीजपुरवठा सुरळीत आणि सुरक्षित व्हायला हवा, या संकल्पनेतून आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात इन्फ्रा एक आणि इन्फ्रा दोनच्या माध्यमातून विविध विद्युत विषयक कामे हाती घेतली आहेत. यामुळे कंपन्या अधिक सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे.

भोसरी आणि परिसरात औद्योगिक कंपन्यांचे जाळे आहे. तसेच, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वीज पुरवठा सक्षम करण्याची गरज आहे. तसेच, औद्योगिक पट्यात धोकादायक झालेल्या वीज पुरवठा यंत्रणेमुळे दुर्घटनेच्या अनेक घटना घडल्या आहेत. औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रश्नाकडे 2014 पूर्वी तत्कालीन सत्ताधार्‍यांनी दुर्लक्ष केले होते. आमदार महेश लांडगे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्याबाबत पाठपुरावा केला आहे.

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे भोसरी परिसरातील विद्यत विषयक समस्यांविषयी आणि त्यांच्या निवारणासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर इन्फ्रा एक आणि इन्फ्रा दोनच्या माध्यमातून विविध कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील वीज पुरवठा यंत्रणा अधिक सक्षम झाली. याअंतर्गत भूमिगत वीज वाहिन्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला.

एकात्मिक उर्जा विकास योजनेअंतर्गत सब-ट्रांसमिशन व डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कला बळकटी देण्यासाठी तसेच शहरी भागात ग्राहक सेवा सक्षम करण्यासाठी भारत सरकारने 2 हजार 100 कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल)च्या माध्यमातून राज्यातील विविध विभागातील ‘डीपीआर’ राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये राज्यातील सर्वाधिक तब्बल 295 कोटी रुपयांची विद्युतविषयक कामे भोसरी विधानसभा मतदार संघात होणार आहेत. त्या कामांना लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्या माध्यमातून उर्वरित विद्युतविषयक कामांना गती देण्यासाठी मदत होणार आहे.

स्थानिक रहिवासी किरण पखाले म्हणाले, “आमदार महेश लांडगे यांचे काम अतिशय चांगले आहे. विद्युत आणि इतर सर्वच विभागातील भरगोस कामे त्यांनी केली आहेत. इन्फ्रा एक आणि दोनची कामे भोसरी विधानसभा मतदारसंघात सुरु झाल्यामुळे या परिसरातील उद्योगाला चालना मिळणार आहे. विद्युत पुरवठा आधीपासून होत असला तरी त्यातील सुरक्षेच्या बाबी पडताळणे आणि सुरक्षित वीज पुरवठा करणे ही महत्वाची बाब आहे. पुढील काळात देखील आणखी विद्युत विभागाची कामे होणार आहेत. त्याचाही फायदा इथल्या कंपन्या आणि नागरिकांना होणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.