Bhosari : बँकेत रक्कम एकाची पण काढली दुसऱ्याने; मयत पतीच्या खात्यावरील रक्कम काढण्यासाठी गेल्यानंतर आला प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – नाव साधर्म्य असलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातील तब्बल पाच लाख रुपये रक्कम एका व्यक्तीने खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून काढून घेतली. मूळ खातेधारकाचा मृत्यू झाल्याने खातेदाराची पत्नी पैसे काढण्यासाठी ( Bhosari ) पावत्या घेऊन बँकेत गेली असता हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार 18 ऑक्टोबर2021  ते  20 एप्रिल 2023 या कालावधीत भोसरी येथील रुपी कॉ ऑपरेटिव्ह बँकेत घडला.

रामशंकर बाबूराम विश्वकर्मा (रा. दिघी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक राहुल नाईक यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2013 मध्ये सहकार खाते आणि रिझर्व्ह बँकेने कारवाई करून रुपी कॉ ऑप बँकेवर कारवाई करून आर्थिक निर्बंध लादले. त्यानंतर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर अवसायक नियुक्त केला. त्यानंतर खातेदारांना कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढता येत नव्हती.

बँकेने प्रयत्न करून खातेदारांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळावेत यासाठी केंद्र सरकार, विमा कंपनी आणि विविध विभागांशी चर्चा करून बँकेच्या खातेदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्याबाबत ऑगस्ट 2021 मध्ये मंजुरी मिळवली. खातेदारांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि खात्यासंबंधीची कागदपत्रे सादर करून पैसे घेण्याचे आवाहन केले.

Maval : निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीराची उत्साहात सांगता

यातच आरोपी रामशंकर विश्वकर्मा याने देखील अर्ज केला. त्या अर्जात त्याने ठेव पावत्या असल्याचे भासवले. मात्र त्या पावत्या गहाळ झाल्याने त्या सादर करू शकत नसल्याचे विश्वकर्मा याने हानिरक्षण बंधपत्र लिहून दिले. त्यासोबत त्याने पॅनकार्ड, आधारकार्ड, पासबुक देखील सादर केले. त्या बंधपत्रावर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी 22 मार्च 2022 रोजी विश्वकर्मा याच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर पाच लाख रुपये ट्रान्सफर केले.

त्यानंतर सात ते आठ महिन्यांनी शांती विश्वकर्मा या बँकेत आल्या. त्यांनी बँकेला सांगितले की, त्यांच्या पतीचे आधीच निधन झाले आहे. त्यांच्या पतीचे रुपी बँकेत मुदत ठेव खाते आहे. त्याच्या पावत्या देखील शांती यांनी सादर केल्या. त्यानंतर बँकेकडून पाच लाख रुपये घेऊन गेलेली व्यक्ती ही मूळ रमाकांत विश्वकर्मा नसून ती निराळीच व्यक्ती असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. बँकेने पैसे नेणाऱ्या विश्वकर्मा याच्याशी पत्रव्यवहार करून पैसे परत करण्यास सांगितले. त्याच्या बचत खात्यावरील रक्कम बँकेने वजा केली. उर्वरित चार लाख 32 हजार 771 रुपये परत न करता विश्वकर्मा याने बँकेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास ( Bhosari ) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.