Mumbai News : स्वबळावर लढून भाजपा विजयाची परंपरा निर्माण करेल – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवेल आणि विजयाची परंपरा निर्माण करेल. भाजपा आता राज्यात सर्वच निवडणुका एकट्याने लढवेल आणि कोणासोबत निवडणूक लढवून फसवणूक करून घेणार नाही, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर यांनी आपल्या समर्थक नेत्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपा मराठवाडा संघटनमंत्री संजय कोडगे, माजी आमदार मोहन फड, भाजपा परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम आणि शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे उपस्थित होते.

 चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, परभणी जिल्ह्यात भाजपाचे संघटनात्मक कार्य चांगले असले तरी निवडणुकात युतीमुळे शिवसेनेला संधी मिळाली आणि जिल्ह्यातील निवडणुकीच्या राजकारणात भाजपा कमकुवत राहिली. आता भाजपा परभणीमध्ये स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार असून पक्ष निवडणुकीच्या राजकारणातही प्रभावी ठरेल आणि विजयाची परंपरा निर्माण करेल. आता महाराष्ट्रात भाजपा एकट्याने निवडणुका लढवेल. एखाद्या पक्षासोबत निवडणूक लढवून फसवणूक करून घ्यायची नाही.

त्यांनी सांगितले की, यापुढे केवळ भारतीय जनता पार्टीलाच राजकीय भवितव्य आहे. एकेका नेत्यांच्या मालकीच्या पक्षांमध्ये भविष्यात काय होणार असा प्रश्न आहे. तथापि, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि त्याचे काम चालूच राहणार आहे. ते म्हणाले की, भाजपामध्ये प्रवेश केलेल्या परभणी जिल्ह्यातील नेत्यांना आपण आश्वस्त करतो की, त्यांचा सन्मान पक्षामध्ये राखला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.