Pimpri News : कोरोनाच्या उपाययोजनांबाबत केंद्रीय पथकाची नाराजी

बेड मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करण्याची सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून महापालिकेच्या उपाययोजनांबाबत केंद्रीय पथकाने नाराजी व्यक्त केली. महापालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. बेड मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करण्याची सूचना त्यांनी केली.

शहरातील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (शुक्रवारी) केंद्र सरकारच्या द्वीसदस्यीय  पथकाने पिंपरी-चिंचवड शहराला भेट दिली.  दिल्ली येथील लेडी हार्डिंगे मेडिकल कॉलेजचे प्रा.डॉ. घनश्याम पतके यांचा या पथकात समावेश होता.

अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटल, महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये तयार करण्यात आलेली वॉररूम तसेच मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील आरटीपीसीआर चाचणी केंद्राला पथकाने भेट देऊन पाहणी केली.

_MPC_DIR_MPU_II

आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत चर्चा करून महापालिकेच्या वतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांची तसेच  कोरोना रुग्णवाढीचा दर, महापालिकेच्या वतीने करण्यात येणारे बेड मॅनेजमेंट, उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर आदीबाबत माहिती घेतली.  दरम्यान, महापालिकेच्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त करत प्रा. डॉ. जुगल किशोर आणि प्रा. डॉ. घनश्याम पतके यांनी विविध सूचना दिल्या.

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील बेड मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्याचे व्यवस्थित नियोजन करावे, अशा सूचना  केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा दिल्ली येथील सफदरजंग मेडिकल कॉलेजचे निदेशक प्रा. डॉ. जुगल किशोर यांनी केल्या.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वॉररुमचे समन्वयक डॉ. क्रिस्टोफर झेव्हियर, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, जम्बो कोवीड हॉस्पीटलचे समन्वयक डॉ. सुनिल पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.