BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : दुसऱ्याची मिळकत तारण ठेवून बँकेची १७ लाखांची फसवणूक; चाकणमध्ये तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दुसऱ्याचे दुमजली घर स्वतःच्या असल्याचे भासवून ते बँकेकडे तारण ठेवून सतरा लाख रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार आणि जामीनदार अशा तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.5) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी छत्रपती राजश्री शाहू सहकारी बँक लिमिटेड, बीड,शाखा चाकण यांच्या अधिकाऱ्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.

कर्जदार दिनेश हरिभाऊ शिंदे (रा. वराळे, ता, खेड ) यांच्यासह पवन खंडू पटारे ( रा. चिंबळी, ता, खेड ) व गणेश शांताराम जाधव (रा. नाणेकरवाडी ,चाकण ता.खेड ) हे दोन जामीनदार अशा तिघांवर फसवणुकीचा गुन्हा चाकण पोलीस दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी सदर बँकेच्या चाकण शाखेचे व्यवस्थापक गणेश सुधाकर लांडे ( वय 32, रा. चाकण ,ता, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दिनेश शिंदे यांनी छत्रपती राजश्री शाहू सहकारी बँकेत 2014 रोजी सतरा लाख रुपयांचे कर्ज मिळावी, अशी मागणी केली होती. त्याकरता त्यांनी मौजे वराळे (ता.खेड) येथील मिळकत नंबर 205 मध्ये 6540 स्क्वेअर फुट जागा मिळकतीचे दुमजली घर तारण ठेवले होते. यामध्ये पवन पठारे आणि गणेश जाधव हे शिंदे यांना जामीनदार होते.

2014 मध्ये शिंदे यांनी 17 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर या कर्जाचे हप्ते भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बँकेने कर्जदार व जामीनदार यांना कर्जाचे हप्ते भरणेबाबत नोटीस पाठवली परंतु त्यांच्याकडून कसलाही नोटिशीला उत्तर न आल्याने बँकेच्या संचालक मंडळाने मीटिंग घेऊन त्यानंतर बँकेने वसुलीसाठी कायदेशीर कारवाई सुरू केली. त्यामध्ये वराळे (ता. खेड) येथील तारण असलेल्या मिळकतीची बँकेने माहिती घेतली असता वराळे ग्रामपंचायत येथील घर मिळकत नंबर 205 ही आनंदराव विठ्ठलराव बुट्टे यांचे नावे असल्याची धक्कादायक माहिती बँकेला प्राप्त झाली.

  • त्यामुळे कर्जदारांनी तारण ठेवलेली मिळकत ही कर्जदारांची नावे नसताना १७ लाखांचे कर्ज घेतल्याने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बँकेची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. त्यानुसार कर्जदार शिंदेसह जामीनदारही कारवाईच्या कात्रीत आले आहेत.

दरम्यान, हि मिळकत तारण ठेवताना अन्य कुणाचा सहभाग यात होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस याची पाळेमुळे खोदणार काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3