Pimpri: शहरातून वाहणा-या नद्यांचे ऑडीट करा; राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या नद्यांचे ऑडीट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कलाटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामधून मुळा 11 किलोमीटर, पवना 25 कि.मी. तर, इंद्रायणी 21 किलोमीटर अंतरावरून वाहते. महापालिकेने जलसंपदा विभागाकडून तीनही नद्यांचे सर्वेक्षण करुन पूररेषेची आखणी करुन घेतली आहे.

  • या पूररेषेमध्ये होणारी अनाधिकृत बांधकामे तसेच नदीत टाकलेल्या राडा –रोड्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले आहे. जलप्रवाहाचा नैसर्गिक स्त्रोत बदलला आहे. या पूररेषेमधील बांधकामांवर सातत्याने कायदेशीर कारवाई होणे अत्यावश्यक होते. परंतु, त्यात पालिका प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे 12 वर्षानंतर शहरवासियांना पूराचा फटका बसला आहे.

अनेक वर्षानंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात पुराचे पाणी नागरी भागात आले आहे. पंचवीस ते तीस वर्षापूर्वी नदीपात्र मोकळे होते. तिथे शेत जमिन होती. त्यामुळे त्यावेळी जरी पूर आला तरी नागरीवस्तीला बाधा पोहचत नव्हती. परंतु, नंतरच्या कालखंडात मात्र, नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले.

  • त्यामुळे नद्यांना थोडा जरी पूर आला. तरी, नदीकाठचा नागरीवस्तीचा भाग पूरग्रस्त होतो. प्रशासन यंत्रणा नेहमीप्रमाणे त्यावेळी तात्पुरती उपाय योजना करते. परंतु, कायमस्वरुपी यावर आजपर्यंत तोडगा काढला गेला नाही. ही दुर्देवाची बाब आहे.

शहरात एकेकाळी दोनशे अडीचशेहून अधिक ओढे नाले होते. आज किती ओढे-नाले शिल्लक आहेत हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पावसाचे पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक स्त्रोत हा हे ओढे नाले हेच होते. परंतु, हे ओढे नाले बजुवून त्यांच्यावर अतिक्रमण करुन बांधकामे झाली आहेत. त्यामुळेही हि पूरपरीस्थिती उद्भवली आहे. तसेच आहे त्या नाल्यांचेही कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरतच नाही ते सगळे नदीकडे जाते.

  • भविष्यात अशी पूरपरीस्थिती शहरात उदभवू नये. त्यासाठी राजकारण, गट-तट बाजूला ठेवून शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणाव्दारे होणा-या मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी सर्वांना एकत्र येणे गरजेचे आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.