Chakan :… अखेर चाकणसाठी भामा आसखेडचे पाणी आरक्षित; 2031 ची लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षण

एमपीसी न्यूज – चाकणकरांसाठी आता भामा आसखेड धरणात पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात चाकण परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. चाकण शहरासाठी भामा आसखेड धरण प्रकल्पातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावास खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या पाठपुराव्याने यश मिळाल्याचे चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शेखर घोगरे आणि उपनगराध्यक्ष अॅड. प्रकाश गोरे यांनी सांगितले.

औद्योगिकरणामुळे दिवसेंदिवस चाकण विस्तारत आहे. या अत्यंत महत्वाच्या नगरपरिषदेसाठी पाणी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांचेकडून चाकण नगरपरिषद (ता. खेड, जि. पुणे) यांना भामा-आसखेड प्रकल्पातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा हक्कास मंजुरी मिळणेबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.

  • शासन निर्णयाद्वारे बिगर सिंचन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा हक्क प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादेनुसार सुधारित स्तर निश्चित करण्यात आलेले होते. शासन निर्णयाच्या अन्वये या योजनेसाठी चाकणची सन २०३१ ची लोकसंख्या विचारात घेऊन 2.1816 दलघमी वाढीव पाण्याच्या हक्कास मंजुरी देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. मात्र, मागील काही वर्षात त्यास मान्यता मिळाली नव्हती. मात्र, पुणे आणि पिंपरीसाठी पाणी नेण्याचे नियोजन झाले. परंतु या भागासाठी पाणी आरक्षित होत नसल्याने स्थानिकांत खदखद होती. अखेरीस सततच्या पाठपुराव्याने खेडचे आमदार गोरे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे.

भामा आसखेड धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आरक्षण मंजूर झाल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार असल्याचे नगराध्यक्ष घोगरे, उपनगराध्यक्ष अॅड. गोरे, माजी नगराध्यक्षा मंगल गोरे, मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्यासह सभापती धीरज मुटके, सुजाता मंडलिक, हुमा जहीरअब्बास शेख, प्रवीण गोरे, स्नेहा नितीन जगताप व नगरसेवकांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.