Pune-Nashik Rail : पुणे नाशिक रेल्वे मार्गात काही ठिकाणी बदल? शेतकऱ्यांनी जाब विचारल्याने प्रकार समोर

एमपीसी न्यूज : पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (Pune-Nashik Rail) कामाला संरक्षण विभागाने चाकण परिसरातील रासे, केळगाव (ता. खेड) वनविभागाच्या हद्दीत दारूगोळा नष्ट करण्याचे क्षेत्र असल्याने हरकत घेतली आहे. संरक्षण विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर या जागेचा विचार केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते; मात्र मागील दोन दिवसांपासून या भागात अधिकारी ड्रोनद्वारे पाहणी करत असल्याची बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली आहे. त्यानंतर स्थानिकांनी या अधिकाऱ्यांकडे कसून चौकशी केल्यानंतर काही ठिकाणी मार्गात थोडासा बदल होणार असल्याची बाब समोर आली आहे.

पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचे काही अधिकारी दोन दिवसांपासून रासे, कडाचीवाडी ,आगरवाडी व राक्षेवाडी या भागात पाहणी करण्यासाठी येत असल्यामुळे नागरिकांनी त्या अधिकाऱ्यांना या बाबत जाब विचारला. चाकण जवळील कडाचीवाडी (ता.खेड) येथील मंदिरामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून या बाबत ग्रामस्थांनी विचारणा केली . काही ठिकाणी लष्कराने हरकत घेतली असल्यामुळे संबंधित संवेदनशील परिसर वगळून लगतच्या भागातून रेल्वेमार्ग नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे. संबंधित अधिकारी हा सर्वे ड्रोनद्वारे करत आहेत. आता काही ठिकाणी बदलणारा हा मार्ग नेमका कुठून जाणार या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचे काम जिल्ह्यात जोरात चालू असतानाच खेड तालुक्यात या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण विभागाकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणचे काम थांबविण्यात आले होते. खेड तालुक्यात लष्कराच्या जागेतून हा प्रकल्प जात असल्याने त्याला अचानक आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे पर्यायी गावांमधील जागा संपादित करण्याबाबत प्रशासनाकडून पाहणी सुरु करण्यात आली आहे.

Pune-Nashik Rail

Talegaon-Chakan-Shikrapur : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाला मिळणार मुहूर्त ?

म्हणून पुन्हा ड्रोनद्वारे पाहणी – Pune-Nashik Rail

राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा एकत्रित उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मार्फत या रेल्वे मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. प्रमुख स्थानकांपैकी चाकण, मंचर तसेच नारायणगाव ही स्थानके कृषी उत्पादन व खासगी मालवाहतूक टर्मिनल असणार असून राजगुरूनगर स्थानक हे फक्त प्रवासी रहदारीसाठी असणार आहे. या प्रकल्पाचे काम जोरात सुरू असताना संरक्षण विभागाकडून खेड तालुक्यातील कामाला आक्षेप घेण्यात आल्याने सध्या काम थांबविण्यात आले होते. ‘संरक्षण विभागाकडून प्रकल्पाच्या खेड येथील संरेखनाला आक्षेप घेण्यात आला होता. खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र असून पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा लगतच्या परिसराची पाहणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.