Chikhali Crime News : मारहाण करून लुटल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तोंड ओळखीच्या दोन तरुणांनी दोघांना मारहाण करून लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री दहा वाजताच्या सुमारास अष्टविनायक चौक, चिखली येथे घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश बाबू नडविनमनी आणि रोहन हिंगे ऊर्फ जॉन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही. दोघेही रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष विक्रम जोगदंड (वय 38, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी जोगदंड व त्यांचा मित्र सुरेश पांचाळ असे फिर्यादी यांच्या दुचाकीवरून साने चौकातून सुरज यास घरी सोडण्यासाठी चालले होते. ते अष्टविनायक चौकात आले असता पाठीमागून आलेल्या आरोपी आकाश आणि रोहन या दोघांनी त्यांना अडवले. तुम्ही कुठे चालला आहात, असे म्हणून शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी फिर्यादी जोगदंड यांनी मारहाण का करत आहात, अशी विचारणा केली. चिडलेल्या आरोपींनी रस्त्याच्या कडेला पडलेले दगड घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. आरोपी रोहन याने फिर्यादी जोगदंड यांच्या खिशातून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. जोगदंड यांना मारहाण करत असताना त्यांचा मित्र सुरज सोडवण्यासाठी आला असता, दोघांनी सुरज याला देखील हाताने मारहाण केली. त्यामुळे सुरज घाबरून तेथून पळून गेला. दोन्ही आरोपी देखील निघून गेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.