Chinchwad Bye-Election : मतांच्या त्रिभाजनामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदानाची (Chinchwad Bye-Election) नोंद झाली आहे. महापालिकेच्या 13 प्रभागांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदा मतदान तीन टक्क्याने घटले असले तरी प्रत्यक्षात दहा हजाराने मतदानात वाढ झाली आहे. भाजप, राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे त्रिभाजन झाले आहे. पोटनिवडणूक असूनही एकीकडे मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले असताना दुसरीकडे उमेदवारांच्या बालेकिल्ल्यातच मतदारांनी निरूत्साह दाखवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या जागेसाठी रविवारी (दि. 26) मतदान झाले. चिंचवड विधानसभा मतदारसंघ राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मोठा मतदारसंघ आहे. चिंचवडमध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 87 हजार 145 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.

या निवडणुकीत 50.47 टक्के मतदानाची नोंद झाली. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल 28 उमेदवार आपले भविष्य अजमावत आहेत. त्यामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात प्रामुख्याने तिरंगी लढत होत आहे.

महापालिकेच्या 13 प्रभागांचा अर्थात 52 नगरसेवकांचा समावेश या मतदारसंघात आहे. त्यामध्ये तब्बल 33 नगरसेवक भाजपचे आहेत. नऊ राष्ट्रवादीचे, सहा शिवसेनेचे तर, अपक्ष चार जण आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचा प्रभाव आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदा मतदान तीन टक्क्याने घटले असले तरी प्रत्यक्षात दहा हजाराने मतदानात वाढ झाली आहे. पोटनिवडणूक (Chinchwad Bye-Election) असूनही मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. मात्र, दुसरीकडे उमेदवारांच्या बालेकिल्ल्यातच मतदारांनी निरूत्साह दाखवल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

भाजपच्या अश्विनी जगताप यांचा प्रभाव असणार्‍या पिंपळे-गुरव-सुदर्शनगर प्रभागात 53.12 टक्के, पिंपळे-गुरव-नवी सांगवी प्रभागात 51.43 टक्के आणि जुनी सांगवी प्रभागात 49.63 टक्के मतदारांनी मतदान केले. राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा प्रभाव असणार्‍या पिंपळे-सौदागर प्रभागात अवघे 45.53 टक्के मतदान झाले आहे.

अपक्ष राहुल कलाटे यांच्या वाकड-पुनावळे प्रभागात 50.96 टक्के, पिंपळे-निलख-वाकड प्रभागात 47.78 टक्के मतदान झाले आहे. स्वत:चे हक्काचे मतदारच मतदानासाठी घराबाहेर न पडल्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. वाढलेले मतदान कोणाला तारणार आणि कोणाला भोवणार याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. उमेदवारांचे प्राबल्य असणार्‍या प्रभागांमध्येच मतदारांनी दाखवलेली उदासिनता कोणाच्या पथ्यावर पडणार, हे गुरूवारी (दि. 2) होणार्‍या मतमोजणी दिवशीच स्पष्ट होईल.

Pune News : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मविआचे रवींद्र धंगेकर आणि रुपाली ठोंबरेंविरुद्ध गुन्हा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.