Chinchwad Crime News : तळेगावातील डॉ. डांगे यांच्या कोट्यावधींच्या फसवणूक प्रकरणी आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील डॉ. श्रीहरी डांगे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात फेब्रुवारी 2018 मध्ये तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तीन वर्षानंतर या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत फिर्यादी यांना काहीच माहिती नाही. त्यामुळे फिर्यादीने माहिती अधिकारातून पोलिसांकडून माहिती मागितली असून पुढील 10 दिवसांत फसवणूक प्रकरणात कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी दिला आहे.

डॉ. सुचिता श्रीहरी डांगे यांनी याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, तुलसी पितांबरदास मनेक, निरव हसमुखराय पंचमाटिया, जर्नल सिंग प्रेमसिंग बावा, इम्तियाज अकबर अली पोरबंदरवाला, डॉ. मेघा निरव पंचमाटिया (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात 23 फेब्रुवारी 2018 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही आर्थिक फसवणुकीचा बाब असताना पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. हे प्रकरण सिव्हिल मॅटर असल्याचे पोलिसांनी डांगे यांना सांगितले. तळेगाव दाभाडे पोलिसांनी या प्रकरणात कुठला तपास केला, काय प्रगती झाली याची डांगे यांना काहीच माहिती नाही. या प्रकरणाच्या तपासाला पुन्हा एकदा गती देण्याची मागणी डांगे यांच्याकडून करण्यात आली आहे.

पोलिसांनी येत्या 10 दिवसांत या प्रकरणी सकारात्मक कारवाई केली नाही, तर आम्ही आंदोलन करू असे डॉ. डांगे यांनी निवेदनात म्हटले आहे. डॉ. डांगे यांनी या फसवणूक प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.