Chinchwad : भोसरी मधील जगताप टोळीवर मोका

एमपीसी न्यूज – भोसरी मधील जगताप टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ( Chinchwad) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.

टोळी प्रमुख आदर्श ऊर्फ कुक्या गोविंद जगताप (वय 22, रा. आदर्श नगर, मोशी पुणे), सुनिल राणोजी जावळे (वय 26, रा. आदर्श नगर, मोशी पुणे), रोहित ऊर्फ कक्या ज्ञानेश्वर सोनवणे (वय 19, रा. आळंदी रोड, भोसरी, पुणे) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे केल्याचे समोर आले. जगताप टोळीतील आरोपींवर भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर 13 गुन्हे दाखल आहेत.

Pimpri :  राजन लाखे यांची साहित्य महामंडळावर निवड

टोळीमधील आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अतंर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव भोसरी पोलिसांनी पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षात आठ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण 39 आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुका भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला आहे. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर लक्ष ठेऊन प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ एक) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, उपनिरीक्षक श्री शेख, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या ( Chinchwad) पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.