Chinchwad News: आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी अंगारकी चतुर्थीला श्रीमान मोरया गोसावी मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला. परवापेक्षा आज आमदार लक्ष्मण भाऊंच्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली आहे. उपचारांना प्रतिसाद देत आहेत. उपचारांची संजीवनी डॉक्टर देत आहेत. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलल्याचे वातावरण पहावयास मिळत आहे.

लक्ष्मण जगताप यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समाजासाठी आणखी काम करण्याची त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे.‌ त्या जोरावर त्यांची लढाई सुरू आहे. शनिवारपासून अर्थात हनुमान जयंतीपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. औषधांच्या रुपाने संजीवनी देण्याचे काम डॉक्टर मंडळी करीत आहे. जणू रामायणातील प्रसंगाची पुनरावृत्ती इथे सुरू आहे. रामायणात रावणाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात लक्ष्मणाला मूर्च्छा आली होती. रामाने पहारा देत हनुमानाने उड्डाण करून संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते. सर्व वानर सेना परमेश्वराचा धावा करत होती. अगदी तसाच धावा आज मंगळवारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर प्रेम करणारी जनता, माता, भगिनी, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते करत आहेत.

 

महामृत्युंजय मंत्राचा अखंड जप ठिकठिकाणी सुरू आहे. लाडक्या गणरायाला साकडे घालत संकष्ट चतुर्थी अर्थात अंगारक चतुर्थीचा उपवास करत आहेत. यामध्ये भाऊंवर प्रेम करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसह आप्तेष्ट आहेत. जेव्हा जेव्हा भक्तांवर संकटे येतात तेव्हा तेव्हा त्यांचे निराकरण बुद्धीची देवता श्रीगणेश करते. म्हणूनच गणपतीला संकटमोचक, विघ्नहर्ता, सुखकर्ता असे संबोधले जाते. त्यासाठी चतुर्थीचा मुहूर्त साधला जातो.

त्यातही संकष्ट चतुर्थी असेल तर अप्रतिम आणि ती संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर दुधात साखर. सर्व संकटांतून मुक्ती. आणि तो मुहूर्त म्हणजे आजची संकष्ट अर्थात अंगारक चतुर्थी. संकष्ट चतुर्थी जेंव्हा मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले जाते.  श्री गणेशाची सहस्र वर्षे तपश्चर्या करणाऱ्या भक्ताच्या नावावरून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारक किंवा अंगारकी म्हणतात. अंगारकी व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात, विघ्न हरण होते, असा भाविकांचा विश्वास आहे.

या विश्वासामुळेच लाडके आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी गणपतीची आराधना केली जात आहे. अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर महामृत्युंजय मंत्राचा जप केला जात आहे. परवापेक्षा आज आमदार लक्ष्मण भाऊंच्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली आहे. उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्याचबरोबर शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे, महिला व कार्यकर्ते यांच्याद्वारे विविध ठिकाणी देवदेवतांच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक पूजा व महामृत्युंजय मंत्राचा जप करत आमदार जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

केंद्र तसेच राज्यातील भाजप व इतर पक्षातील नेत्यांनी रुग्णालयात येऊन तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आमदार जगताप यांच्या तब्बेतीविषयी आस्थेने चौकशी केली. यात केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, रामदास आठवले यांनी दूरध्वनीद्वारे आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्याशी संवाद साधत प्रकृतीविषयी विचारपूस केली. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राम शिंदे, संजय भेगडे, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आशिष शेलार, राहुल कुल, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील शेळके, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यासह शहरातील भाजप व अन्य पक्षातील शहर पातळीवरील नेत्यांनी रुग्णालयात येऊन जगताप बंधूंची भेट घेतली. यावेळी विजय जगताप, शंकर जगताप तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संवाद साधत आमदार जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सर्व स्थरातून करण्यात आलेली प्रार्थना, जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांनी दिलेला आधार याबद्दल आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप व विजय जगताप यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.