Chinchwad News: ओमायक्रॉन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने मंगलमूर्तींची माघी यात्रा

एमपीसी न्यूज – ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री मंगलमूर्तींची माघी यात्रा  रद्द करण्यात आली आहे.  मंगलमूर्तींच्या पालखीचे देव गाडीतून गुरुवारी (दि. 3) मोरगांवकडे प्रस्थान होणार आहे.  मंगलमूर्तींची यात्रा कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरी होणार असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

महान गणेशभक्त श्री मोरया गोसावी यांनी  चिंचवड,  येथे संजीवन समाधी घेतली. त्यांना श्री क्षेत्र मोरगाव, येथे तपश्चर्येने श्री मंगलमूर्तींची मूर्ती प्राप्त झाली आहे. ती मूर्ती वर्षांतून दोन वेळा श्री क्षेत्र मोरगावला पालखीतून व रथातून नेण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा अत्यंत साधेपणाने साजरी केली जाणार आहे. यात्रेचे चिंचवडहून गुरुवारी (दि.3) रोजी दुपारी चार वाजता मोरगावकडे प्रस्थान होणार आहे.  सध्या देशात, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी माघी यात्रा 3 ते 8 फेब्रुवारी या काळात संपन्न होणार आहे. यावर्षी माघी यात्रेचा कालावधी कमी करण्यात आला असून तो 6 दिवसांचाच राहील. कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्या काही महिन्यात सर्व धार्मिक सण, उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने, लोकांनी एकत्र न येता साजरे केले आहेत.

यात्रा 3 फेब्रुवारी रोजी मोरगावला जाणार आणि 8 फेब्रुवारीला देव गाडीतून परत येणार आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी. यावर्षी श्री मंगलमूर्तींची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार पार पडणे आवश्यक असल्याचे मंदार महाराज देव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.