Chinchwad News : लेखी, शारीरिक चाचणीसाठी डमी उमेदवार बसवल्याचे दोन प्रकार उघड; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पहिल्या टप्प्यातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये एका उमेदवाराने त्याची लेखीची तयारी नसल्याने लेखी परीक्षेला तर दुसऱ्याने मैदानी चाचणीची तयारी नसल्याने मैदानी चाचणीसाठी डमी उमेदवार बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती 2019 च्या 720 जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भरती सेल तयार करण्यात आला होता. या सेल मार्फत 19 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नागपूर, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या जिल्हयामधील परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यातील पात्र उमेदवारांची 11 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत राज्य राखीव बल गट क्रमांक 1 रामटेकडी, हडपसर, पुणे येथे मैदानी चाचणी घेण्यात आली. लेखी आणि मैदानी परिक्षा ही व्हिडीओ शूटिंग माध्यमातून घेण्यात आली. त्यात सर्व उमेदवाराचे मार्क त्यांना कळविण्यात आले होते. त्यानंतर पात्र उमेदवारांना त्यांची कागदपत्र पडताळणी करण्यासाठी बोलाविण्यात आले. त्यावेळी पात्र उमेदवारांची पडताळणी व्हिडीओ शुटिंग करून घेण्यात आली होती.

3 जानेवारी 2022 रोजी सुरु असलेल्या पडताळणी दरम्यान उमेदवार गणेश मारुती रोमन (वय 30, रा. मु. पो. नारायणगाव, पाटेखैरमळा, ता. जुन्नर, जि. पुणे) याचे मूळ कागदपत्र पडताळणी करीत असताना त्याचे लेखी परीक्षेसाठी असलेल्या अॅडमिट कार्डवरील त्याचा मुळ फोटो आणि त्याची सही तसेच लेखी परीक्षा करीता केंद्रात हजर राहण्यापूर्वी लावलेला उमदेवाराचा फोटो व उमेदवाराची सही यामध्ये विसंगती दिसून आली. त्यामुळे त्याल ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा लेखी परिक्षेचा अभ्यास चांगला नसल्याने त्याने त्याच्या सारखा दिसणारा त्याचा मित्र ज्ञानेश्वर गोडगोंडा (रा. येडगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) याचा फोटो स्वतःच्या आधारकार्डवर पिक्स आर्ट एडिटिंग अॅपच्या मदतीने लावून तसे डुप्लीकेट आधारकार्ड तयार करुन त्यास लेखी परिक्षेला बसवल्याचे निष्पन्न झाले. गणेश आणि ज्ञानेश्वर या दोघांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश याला पोलिसांनी अटक केली आहे.

4 जानेवारी 2022 रोजी सुरु असलेल्या कागदपत्रे पडताळणी दरम्यान उमेदवार जीवन त्र्यंबक काकरवाल (वय 23, रा. मु.पो. रघुनाथपुरवाडी, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद) याचे मुळ कागदपत्र पडताळणी करीत असताना त्याचे मैदानी परीक्षेसाठी असलेल्या ओळखपत्रावरील मुळ फोटो आणि मैदानी चाचणी करीता आल्यावर वेब कॅमेऱ्याने व्दारे घेतलेला फोटो, सही यांची पडताळणी केली आसता फॉर्मवरील फोटो आणि स्वाक्षरी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले. या उमेदवाराचे मैदानी चाचणी दरम्यान घेण्यात आलेल्या बायोमॅट्रीक डेटाशी त्याची अंगुली मुद्रा पडताळणी केली असता ती जुळुन आली नाही. याबाबत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत यांनी पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यामुळे जीवन याला ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याची लेखी परिक्षा झाल्यावर शारिरिक परिक्षेची तयारी नसल्यामुळे त्याचा मित्र अजय गोमलाडु (रा. औररंगाबाद) याच्या मदतीने एका बनावट उमेदवारास शारिरिक चाचणीसाठी पाठवून त्याच्या मार्फतीने तो शारिरिक चाचणीत पास झाल्याचे निष्पन्न झाले.

तसेच महत्त्वाचा पुरावे असलेला जीवन त्र्यंबक काकरवाल याचा मोबाईल हा त्याच दिवशी कागदपत्र पडताळणीला आलेले उमेदवार रविंद्र लालचंद गुसिंगे वय 25, रा. मु. हुसेनपुर, पो. चित्तेपिंपळगाव, औरंगाबाद), चरणसिंग महासिंग काकरवाल (वय 24, रा. रघुनाथपुरवाडी, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद) यांचयाकडे दिल्याचे व ते दोघे तो मोबाईल फोन घेऊन निघून गेल्याचे लक्षात आले. पोलिसांनी जीवन आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणांचा तपास गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय, गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक, गणेश रायकर, सहाय्यक फौजदार नारायण जाधव, पोलीस कर्मचारी प्रविण दळे, तुषार शेटे, मो. गौस नदाफ, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, तुषार काळे, धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.