Ind Vs SA: दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाला दणदणीत पराभूत करत रचला इतिहास

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी)सात गडी राखून साडेतीन दिवसातच मिळवला मोठा विजय. डीन एलगर ठरला ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार नेता कसा असावा याचे सप्रमाण उदाहरण जगापुढे दाखवत डीन एलगरने जबरदस्त खेळी करत बलाढ्य भारतीय संघाला सात गडी राखुन पराभुत करत धूळ चारली आणि आपल्या संघाला एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला, भले त्याचे शतक पूर्ण झाले नसेल,पण त्याच्या नाबाद 96 धावा या कुठल्याही शतकाहून अधिक मौल्यवान म्हणून इतिहासात कायमस्वरूपी उल्लेखल्या जातील.

पावसाने आणलेल्या व्यत्ययानंतर चहापानानंतर सुरू झालेल्या आजच्या चौथ्या दिवसाच्या खेळात यजमान आफ्रिका संघाने जबरदस्त सकारात्मक खेळ दाखवून आक्रमक खेळत मायदेशी दरबनच्या मैदानावर पहिल्यांदाच मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत इतिहास घडवला,त्याचवेळी हातातोंडाशी आलेला विजयाचे पराभवात झालेले की केलेले रूपांतर बघण्याची आणि ते सोसण्याची वेळ भारतीय संघावर आणि समर्थकांवर आली.

आज सकाळपासून खराब हवामानामुळे खेळ सुरु होण्यास विलंब लागला, जवळपास पाचेक तासाहुन अधिक काळाचा खेळ खराब झाल्यानंतर भारतीय वेळेनुसार साधारण सातनंतर आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली खरी, पण यजमान आफ्रिका संघाने आज खेळ सुरु झाल्यावर एकदम सकारात्मक खेळत चेंडु न चेंडू इतिहास बदलण्याची मानसिकता दाखवली,ज्यामुळे बलाढ्य म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पहिल्यांदाच दरबनच्या मैदानावर पराभव मिळाला तर 217 या याआधीच्या सर्वोच्च धावसंख्येचा फक्त एकदाच यशस्वी पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने 240 धावांचा यशस्वी पाठलाग करत आपल्या नावावर इतिहास घडवला आणि भारतीय संघाला जबरदस्तरित्या पराभूत करत हा सामना आणि याचबरोबर मालिका जिंकण्याच्या स्वप्नाला नेस्तनाबूत करत चारीमुंडया चित केले.

आज भारतीय गोलंदाज एकदमच निस्तेज आणि निष्प्रभ ठरले, ज्याचा फायदा उठवून कर्णधार डीन एलगरने एक अविस्मरणीय खेळी करत कसोटी क्रिकेट हे का अनिश्चितेचा खेळ आहे असे म्हणतात ते सोदाहरण सिद्ध करून या चिरपरिचित म्हणीची प्रचितीही दिली.खरेतर या कसोटीत पहिल्या दिवसापासून दोलायमान परिस्थिती बघायला मिळाली, कधी भारत, कधी आफ्रिका वरचढ वाटत होते, पहिल्या दिवशी मजबूत भारतीय संघाला केवळ 202 धावात गुंडाळून आफ्रिका संघाने सुरुवात चांगलीच केली होती, त्यात त्यांनी पहिल्या डावात 27 धावांची नाममात्र का होईना पण आघाडी घेतली, त्याने त्यांच्या संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला ,पण भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगले खेळत 240 धावांचे मोठे लक्ष्य आफ्रिका संघापुढे ठेवल्यावर सर्वानाच भारतीय संघ या सामन्यासह मालिका आरामात जिंकेल असेच वाटत होते,पण यजमानांना मात्र काही तरी तुफानी करून दाखवायचेच होते असे त्यांचा दुसऱ्या डावाला सुरुवात झाल्यापासूनच जाणवत होते, कालचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा त्यांनी दोन बाद 118 अशी चांगली धावसंख्या करून आपल्या विजयाकडे दमदार पाऊल टाकले होते,मात्र या मैदानावरचा त्यांचा इतिहास बघता जो तो या सामन्यात भारतीय संघालाच विजयासाठी पसंती देत होता,त्या सर्व क्रिकेट पंडितांची भविष्यवाणी खोटी ठरवत त्या सगळ्यांचे दात त्यांच्याच घशात घालत इतिहास घडवला आणि क्रिकेट मध्ये कहीही कधीही घडू शकते या पूर्वापार प्रचलित म्हणीला सत्यात उतरवून भाकित कधीही खरे होत नाही हेच सिद्ध केले.

या कसोटीत नियमित कर्णधार विराट कोहलीच्या जागी नेतृत्व करणाऱ्या लोकेश राहुलला आज ना नेतृत्वात कल्पकता दाखवता आली ना गोलंदाजांना योग्यरित्या वापरून घेता आले,त्यातच प्रमुख अस्त्र म्हणून ओळखला जाणाऱ्या बुमराहनेही कर्णधार राहुलला निराश करत निष्प्रभ गोलंदाजी केली,एकंदरीत राहुलच्या अनुनभवी नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजयाच्या समीप असूनही विजय गाठता आला नाही याचे शल्य पुढील अनेक वर्षे भारतीय क्रिकेट रसिकांना सलत राहील.

एलगरने विजयी चौकार मारत आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, तो 96 धावा काढून नाबाद राहिला तर बाऊमाने नाबाद 23 धावा केल्या, तर वेनडेरसेनने महत्वपूर्ण चाळीस धावा केल्या.या विजयाने तीन सामन्याची ही मालिका एक विरुद्ध एक अशी बरोबरीत आली असून तिसरा आणि अंतिम सामना केपटाऊन येथे येत्या अकरा तारखेपासून सुरू होणार आहे,त्यातला विजेता या मालिकेला जिंकेल. हक विजय आफ्रिका संघाला खुप मोठा आत्मविश्वास आणि अवर्णनीय आंनद देणारा तर भारतीय संघाला चिरकाल सलत राहणारा आहे.
जबरदस्त खेळी करणाऱ्या डीन इलगरला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

धावफलक
भारत पहिला डाव 202
दुसरा डाव 267
द. आफ्रिका
पहिला डाव 227
दुसरा डाव
तीन बाद 241

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.