Pune News : टँकर भरणा केंद्रावरील मीटर बंद असण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज : रामटेकडी येथील टँकर भरणा केंद्रावरील मीटर गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहेत. असे असताना देखील तेथून रोज अनेक टँकर भरले जातात. याबाबत वारंवार कळवूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.

रामटेकडी टँकर भरणा केंद्रावरील दोन्ही मीटर गेले दहा महिने बंद आहेत. ही माहिती 29 नोव्हेंबर 2021 रोजी महापालिका अधिकार्‍यांना पत्राद्वारे दिली होती. मात्र, अजूनही हे मीटर बंदच आहेत. या टँकर पॉईंटवरील मीटर बंदच ठेवण्यात कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत का? याची तातडीने चौकशी करावी, हे मीटर तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत व हे मीटर बंद असण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

पुण्यात अडीच हजार कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेत पाचशे कोटी रुपये खर्च करून तीन लाख घरांमध्ये पाणी मीटर्स बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या महापालिकेला स्वतःचे दोन पाण्याचे मीटर महिनोन् महिने दुरुस्त करता येत नाहीत, ती महापालिका हे तीन लाख मीटर वर्षानुवर्षे सुस्थितीत ठेवण्याच्या गप्पा कशाच्या आधारावर मारते, हे कोडेच आहे, असा सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान रामटेकडी येथील टँकर केंद्रांवर बसविण्यात आलेले मीटर वारंवार चोरीला जात आहेत़, याबाबत महापालिकेने पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार केली आहे़. आता येथे वायफाय असलेले सेंसर मीटर बसविण्यात येणार असून, ते येत्या महिनाभरात कार्यान्वित होतील, तोपर्यंत मॅन्युअल मीटर रीडिंग सुरू राहणार आहे. टँकर केंद्रावरील सर्व नोंदी मीटर बंद असताना रजिस्टरमध्ये रोजच्या रोज केल्या जातात. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.