Chinchwad : नादब्रह्मच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवात मंगेशकर भावंडे एकत्र येतात तेंव्हा….

एमपीसी न्यूज – मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा ‘ब्रीद तुझे जगी दीनानाथ’ हा सांगीतिक ग्रंथ डॉ. वंदना घांगुर्डे यांनी लिहिला. या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला लतादीदीं समवेत सर्व मंगेशकर भावंडे एकाच रंगमंचावर उपस्थित होती. या ग्रंथाचे प्रकाशन लता मंगेशकर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे करण्यात आले. संगीत क्षेत्रात दिग्गज असलेली मंगेशकर भावंडे एकाच मंचावर आली.

महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक क्षेत्रातली पिंपरी चिंचवड मधली नादब्रम्ह परिवार ही संस्था देशभर शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार आणि मराठी संगीत नाटकांचे पुनरूज्जीवन निर्मिती आणि प्रयोग सादरीकरण गेले तीस वर्ष सातत्याने करत आहे. सांस्कृतिक क्षेत्रातली ही एक अग्रगण्य संस्था असा तिचा लौकिक आहे. नादब्रह्म ही संस्था मागील 28 वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव आयोजित करते. दीनानाथ मंगेशकर यांची सर्व संगीत नाटक ही संस्था करते. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवार आणि रविवारी हा महोत्सव आयोजित केला जातो. हा महोत्सव पिंपरी-चिंचवड शहरातील संगीत नाट्य प्रेमींसाठी मेजवानी ठरतो.

नादब्रह्मच्या अनेक कार्यक्रमांसाठी लता मंगेशकर यांनी हजेरी लावल्याची आठवण डॉ. वंदना घांगुर्डे यांनी सांगितली. डॉ. वंदना घांगुर्डे सांगतात लतादीदींनी वयाच्या आठव्या वर्षी रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले. संगीत सौभद्र या नाटकात त्यांनी नारदाची भूमिका केली. पंडित दीनानाथ मंगेशकर यांची बलवंत संगीत मंडळी ही कंपनी  होती. त्यांनी केलेल्या संगीत सौभद्र नाटकात एका प्रयोगाला नारदाचे पात्र करणारी व्यक्तीच आली नाही. त्यामुळे नाटक कसं करायचं अशी चर्चा सर्वांची सुरू होती. त्यावेळी लतादीदी शेजारी बसल्या होत्या. बाबा मी करते नारदाचे काम, असे म्हणून लतादीदींनी नारदाची पदे म्हणून दाखवली. त्याचबरोबर बाबा मी तुमच्या पेक्षा एक वन्समोअर जास्त घेईन, असा विश्वास देखील दीदींनी बोलून दाखवला. बोलल्याप्रमाणे खरोखर दीदींनी दीनानाथ मंगेशकर यांच्या पेक्षा एक वन्समोअर जास्त घेतला सुद्धा. स्वतः बद्दल आणि गाण्याबद्दल त्यांना आत्मविश्वास होता.

दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने भरवला जात असलेला संगीत नाट्य महोत्सव दीदींच्या पंच्याहत्तरी निमित्त त्यांच्या सुरांना समर्पित करावा यासाठी ‘हृदया’ हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी या विषेशांकाला शुभेच्छा संदेश दिला होता. संगीत क्षेत्रातील अनेक संगीतकारांनी या  विशेषांकामध्ये लेख लिहिले होते. कार्यक्रम पाच दिवस साजरा करण्यात आला.

लतादीदींच्या घरी प्रभू कुंजला महोत्सवाचे निमंत्रण करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ज्यावेळी डॉ. रवींद्र घांगुर्डे तिथे गेले तेव्हा दीदी त्यांना म्हणाल्या, ‘तुम्ही माझ्या बाबांची गायकी अभ्यासली आहे. ती उत्तम गाता यावर्षीच्या महोत्सवात तुम्ही माझ्या बाबांचे नाटक संगीत मानापमान सादर करावं आणि ते मला पाहता यावं अशी त्यांनी सूचना केली. त्यानुसार संगीत मानापमान नाटक दीदीने पाहिलं आणि खूप कौतुकही केलं आशीर्वादही दिले. यावेळी सर्व मंगेशकर भावंडे एकाच मंचावर आली होती.

दीनानाथ मंगेशकर यांच्या सुरांमुळे घांगुर्डे, मंगेशकर परिवार आणि नादब्रह्म संस्था यांची घट्ट वीण तयार झाली आहे. नादब्रम्ह ही संस्था मास्टर दीनानाथांची संगीत नाटक नेहमी करते. हा पिंपरी-चिंचवडकरांचा मोठा बहुमान असल्याचेही डॉ. घांगुर्डे सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.