Pimpri News : महाविद्यालये सुरू होण्यास शासन निर्णयाचा ‘अडथळा’, आज बहुतांश महाविद्यालयात वर्ग रिकामेच

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून (मंगळवार, दि.12) महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू होणार होती. पण, पुणे विद्यापीठाला उच्च शिक्षण संचालनालयाच्या निर्देशांची, तर उच्च शिक्षण संचालनालयाला शासनाकडून निर्देश मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू होण्यास शासन निर्णयाचा ‘अडथळा’ निर्माण झाला असून, आज बहुतांश महाविद्यालयात वर्ग भरलेच नाहीत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 12 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

शहरातील महाविद्यालयात अद्याप काही विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू आहेत तसेच शासन व विद्यापीठाचा निर्णय झाला नसल्याने सुरू नसल्याचे अनेक महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे आज प्रत्यक्ष वर्ग भरले नाहीत. शहरातील महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने, विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी हजेरी लावली होती. महाविद्यालये सुरू करण्याच्या दुष्टीने आवश्यक तयारी केली जात आहे, असे शहरातील महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असून, जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.