Pune News : ईडीने सील केलेल्या डी.एस.के यांच्या बंगल्यात सहा लाखांची चोरी 

एमपीसी न्यूज – सक्तवसुली संचालनालयाने (ED) सील केलेल्या मराठी बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या पुण्यातील बंगल्यात सहा लाखांची चोरी झाली आहे. याबद्दल चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी हे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या चार वर्षांपासून तुरुंगात आहेत. ईडीने त्यांच्यावर केलेल्या कारवाईदरम्यान त्यांचा बंगलाही जप्त केला होता.

याप्रकरणी भाग्यश्री कुळकर्णी (वय 37) यांनी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगल्याच्या दरवाज्याचे सील आणि लॉक तोडून चोरट्यांनी बंगल्यातले 8 एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर्स, सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातल्या चांदीच्या वस्तू, कॅमेरा, गिझर असा एकूण सहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

चतुःश्रुंगी मंदिराजवळ डीएसकेंचा 40 हजार चौरस फुट जागेत पसरलेला बंगला आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा बंगला ईडीने जप्त करत, सील केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.