BJP : जाहीर झालेल्या भाजप कार्यकारणीवरुन सुंदोपसुंदी?

कार्यकारिणी सर्वसमावेशक असल्याचा शहराध्यक्षांचा दावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या (BJP) जाहीर झालेल्या जम्बो कार्यकारिणीवरुन सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. नवीन कार्यकारिणीत सर्वांत महत्वाचे असलेले संघटन सरचिटणीसपद जाहीर केले नाही. या कार्यकारिणीवर शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह आमदार उमा खापरे यांची छाप दिसून येत असल्याचे सांगत काही जणांकडून नाराजाची सूर उमटत आहे. कार्यकारिणीत भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांची अधिकची वर्णी लागली नसल्याचे दिसून येते. दरम्यान, कार्यकारिणी सर्वसमावेशक असल्याचा निर्वाळा शहराध्यक्षांनी केला.

शंकर जगताप यांची 19 जुलै रोजी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. दोन महिन्यांनी त्यांनी आपली जम्बो कार्यकारीणी जाहीर केली. आगामी काळात होणा-या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी महत्वाची मानली जाते. परंतु, या कार्यकारिणीवरुन नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकारिणीत संघटन सरचिटणीस असलेले अमोल थोरात यांना कार्यकारिणीतून वगळ्यात आले आहे.

माजी उपमहापौर असलेल्या तुषार हिंगे यांना युवा मोर्चाचे अध्यक्ष केले. पण, हिंगे हे युवा मोर्चाच्या अध्यक्षपदासाठी लागणा-या वयाच्या नियमात बसत नसल्याचे काही कार्यकर्त्यांचे मत आहे.

मागील कार्यकारिणीत सरचिटणीस असलेले राजू दुर्गे यांच्याकडे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पक्ष प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपविली. तर, विजय फुगे, मोरेश्वर शेडगे यांना वगळण्यात आले आहे. सरचिटणीसपदी पिंपरीतील संजय मंगोडेकर, चिंचवडमधील शीतल शिंदे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके आणि भोसरीतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, शैला मोळक, अजय पाताडे यांना संधी देण्यात आली आहे.

कार्यकारिणीत भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांची अधिकची (BJP)  वर्णी लागली नसल्याचे दिसून येते. मात्र, लांडगे यांनीच जवळच्या समर्थकांना शहर कार्यकारिणीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

कोणतीही नाराजी नाही, सर्वसमावेशक कार्यकारिणी – शंकर जगताप

याबाबत बोलताना शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, ”सर्वसामवेशक कार्यकारिणी जाहीर केली आहे. सर्व पदाधिकारी, नेते आणि काम करण्यास इच्छूक असलेल्यांना संधी देण्यात आली आहे. कोणाच्या सांगण्यावरुन कोणाला संधी दिली नाही. काम करणार नसलेल्यांची नावे देखील कापली आहेत.

Marunji : उघड्या दरवाजा वाटे दोन लॅपटॉप चोरीला

मागच्यावेळी संधी न मिळालेल्यांना यावेळी संधी दिली आहे. तीनही मतदारसंघातील कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची नाराजी नसून कुठल्याही नेत्याचा वरचष्मा कार्यकारीणीवर नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.