Pune News : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 142व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्याचे पुण्यात आयोजन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 142 व्या तुकडीचा आज (दि. 30 मे) दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या खेत्रपाल परेड ग्राउंडवर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधिनीत 2019 या वर्षी रुजू झालेल्या 142 व्या तुकडीने तीन वर्षांचे अत्यंत खडतर प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आजच्या या औपचारीक सोहळ्यात हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

खेत्रपाल परेड ग्राउंडवर पार पडलेल्या दीक्षांत संचलनाचे निरीक्षण एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी, PVSM, AVSM, VM, ADC, हवाई दल प्रमुख (CAS) यांनी केले.

दरम्यान, या संचलनावेळी एकूण 907 छात्रांनी सहभाग घेतला. त्यातील 317 जणांचे यंदाचे अंतिम वर्ष होते. या अंतिम वर्षातील विद्यार्थांपैकी 212 लष्कराचे छात्र , 36 नौदलाचे , 69 हवाई दलाचे आणि 19 छात्र (भूतान, ताजिकिस्तान, मालदीव, व्हिएतनाम, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि सुदान) या मित्र राष्ट्रांमधील होते.

दीक्षांत संचलन सोहळ्यावेळी गुणवत्तेत उत्तम कामगिरी केलेल्या छात्रांचा गौरव करण्यात आला. गुणवत्तेच्या क्रमवारीत प्रथम आल्याने अकादमी कॅडेट Adjutantअभिमन्यू सिंग यांना राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. बटालियन कॅडेट Adjutant अरविंद चौहान यांना द्वितीय क्रमांकासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक देऊन गौरवण्यात आले, तर गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल स्क्वॉड्रन कॅडेट कॅप्टन नितीन शर्मा यांना राष्ट्रपतींचे कांस्य पदक देण्यात आले. दरम्यान, यंदाच्या प्रतिष्ठित  ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ चा मान MIKE स्क्वॉड्रनला मिळाला.

या कार्यक्रमप्रसंगी एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी 142 व्या तुकडीच्या छात्रांच्या कामगिरीचे कौतुक केले.  भविष्यातील वाटा शोधण्यासाठी नेमकं काय करायचं आणि एक लष्करी अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा याविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.