PMPML : पीएमपीएमएलच्या डिझेलवरील बसेस सीएनजीवर रुपांतरीत कराव्यात – पालकमंत्री

एमपीसी न्यूज : प्रदूषणावर मात करण्यासाठी (PMPML) हरित ऊर्जेचा वापरावर भर देणे आवश्यक असून त्या दृष्टीने पीएमपीएमएलच्या डिझेलवरील सर्व बसेस सीएनजी इंधनावर रूपांतरित कराव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

 

पुणे महानगरपालिका येथे पीएमपीएमएल, पाणीपुरवठा, जायका प्रकल्प, पुणे शहरातील रस्तेदुरुस्ती, कात्रज- कोंढवा रस्ता तसेच वाघोली येथील समस्यांच्या अनुषंगाने आढावा बैठकांचे पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचींद्र प्रताप सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीस आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी पीएमपीएमएलचे मनुष्यबळ, निवृत्त (PMPML) कर्मचाऱ्यांची देणी व इतर आर्थिक बाबींचा आढावा घेतला. पीएमपीएमएलच्या मालकीच्या डिझेल इंधनावरील कार्यरत 123 बसेस तसेच बंद स्थितीतील 50 बसेस अशा सर्व बसेस येत्या दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने सीएनजीवर रूपांतरित करण्यात याव्यात, जेणेकरुन पीएमपीएमएल ही संपूर्ण बसेस सीएनजी व ई-बसेसच्या रुपात हरित उर्जेवर आधारित सेवा होईल. चालू बसेस बंद पडण्याचे प्रमाण शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.

Talegaon Dabhade : आदर्श विद्या मंदिर संकुलात भूमिगत पाण्याच्या टाकीचे हस्तांतरण व वृक्षारोपण

24 x 7 समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा –

यावेळी 24 x 7 समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना टाक्यांची कामे, दाब जलवाहिन्या, वितरण नलिकांच्या कामांची सद्यस्थितीची माहिती पालकमंत्री पाटील यांनी घेतली. सर्व कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सादरीकरण केले. या प्रकल्पांतर्गत 82 साठवण टाक्यांची कामे प्रस्तावित होती. त्यातील 44 टाक्या पूर्ण झाल्या असून 20 टाक्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. 5 टाक्या लगतच्या झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

5 टाक्यांचे नव्याने कार्यादेश देण्यात आले असून तेवढ्याच टाक्यांची नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. 107 कि.मी. च्या मुख्य दाब नलिकांपैकी 74 कि.मी.चे काम पूर्ण करण्यात आले असून वितरण 1200 कि.मी.च्या वितरण नलिकांपैकी 836 कि.मी. चे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामही गतीने सुरू आहे.

या प्रकल्पांतर्गत 2 लाख 82 हजार एएमआर मीटर बसविण्यात येणार असून आतापर्यंत 1 लाख 27 हजार मीटर बसविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

पालकमंत्री पाटील यांनी जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पाची पूर्णत्वाची मुदत 2025 अखेरची असून प्रक्रिया होणारे पाणी बांधकाम, उद्योग, उद्याने, शेती जलसिंचन आदींना देण्याच्यादृष्टीने मागणी- पुरवठ्याबाबत अहवाल तयार करावा, असे ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.