Dighi : दिघी, बोपखेलचा समावेश पिंपरी-चिंचवड तहसीलमध्ये करण्याची मागणी!

एमपीसी न्यूज – दिघी व बोपखेल ही गावे हवेली तालुक्यातून (Dighi) वगळून पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयातील सज्जांना जोडण्याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उत्पन्न व ‍रहिवाशी दाखला, जातीचा दाखला, ‍‍अधिवास प्रमाणपत्र यांचे पोर्टल हवेली व पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय एकत्र असल्यास विद्यार्थी तसेच नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गावे दिघी व बोपखेल ही गावे यापूर्वी हवेली तहसील कार्यालय, जि. पुणे अंतर्गत येत होती.

मागील काही कालावधीमध्ये सदर गावे अभिलेख सहीत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्न केली आहेत. परंतु, ही गावे हवेली तहसील कार्यालयाच्या हद्दीतील सजात समाविष्ट असल्याने गाव पिंपरी चिंचवडमधील पण तलाठी आस्थापना हवेलीकडे अशी अवस्था असल्याने या तलाठी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.

उत्पन्न व ‍रहिवाशी दाखला, जातीचा दाखला, ‍‍अधिवास प्रमाणपत्र यांचे पोर्टल हवेली व पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय एकत्र असल्याने विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना सदरील दाखले काढण्याकरीता पोर्टलवर ताण येऊन नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

तसेच, शालेय महाविद्यालयांतील प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांकरीता अनेक महिन्यांची वाट पाहवी लागते. त्यानुसार हवेली तहसील कार्यालय व पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय यांचे पोर्टल स्वतंत्र करणे गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ नागरिक, विकलांग, अपंग यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्याकरीता (Dighi) हवेली तालुका तहसील कार्यालय, पुणे येथे जावे लागते. त्यांना या कामी अनेक दिवस हेलपाटे मारावे लागतात.

Sangvi : उघड्या दरवाजा वाटे दीड लाखांचा ऐवज चोरीला

सदरचा लाभ घेण्याकरीता त्यांना शहरापासून दूर जावे लागत असल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनावरील रोष दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते. पिंपरी-चिंचवड शहरातील महसूली अभिलेख अद्यापही हवेली तालुक्यामध्ये असल्याने कार्यालयीन कामकाजावर ताण येतो, असेही आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सबब, अपर तहसील कार्यालय याना अतिरिक्त कर्मचारी वर्ग देऊन अभिलेख, संजय गांधी योजनेचे स्वतंत्र डेस्क या कार्यालयात निर्माण करण्याची मागणी केली आहे.

हवेली तालुक्यातील पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधीत सर्व अभिलेख पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाकडे हस्तांतर करण्यात यावे. त्यामुळे नागरिकांची ओढाताण होऊन आर्थिक वेळेचे नुकसान होणार नाही.

विशेष म्हणजे, सर्वांना एकाच ठिकाणी सर्व सरकारी सुविधा मिळण्याकरिता सोयीचे होईल. बोपखेल व दिघी ही गावे सज्जासहीत पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाशी संलग्न करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.

त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.