Pimpri News : कोरोनामुळे आई वडील गमावलेल्या मुला मुलींचे सांत्वन व दिवाळी फराळ वाटप

एमपीसी न्यूज – कोरोना आपत्तीमुळे आईवडीलांचे छत्र गमावलेल्या शहरातील मुलां-मुलींच्या दुःखात महापालिका सहभागी असून त्यांच्या शिक्षणासाठी ‘उमेद जागर’ या उपक्रमातून सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

महानगरपालिकेच्या हद्दीतील कोरोनामुळे पालकांचे छत्र हरविलेल्या मुला- मुलींचे मुख्य प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त दालनात सांत्वन करून त्यांना महापौर उषा ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उप आयुक्त अजय चारठाणकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

आयुक्त पाटील यांनी सर्व मुला-मुलींशी समक्ष चर्चा केली. त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांकडून मुलांच्या शिक्षणाची आणि गमाविलेल्या पालकांविषयी सविस्तर माहिती त्यांनी घेतली आणि विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करावे याकडे नातेवाईकांनी त्यांना मार्गदर्शन करावे असेही आयुक्त पाटील यावेळी म्हणाले.

आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून कोविडमुळे अनाथ झालेल्या व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांसमवेत दिवाळी फराळ उपक्रम आयोजित करण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी नियोजन केले. या कार्यक्रमाला बारा पैकी सात मुले त्यांच्या नातेवाईकांसह उपस्थित होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.