Wakad News : तुला काय करायचे ते कर, माझ्याकडे रोज पन्नास पोलीस येतात

पोलीस कर्मचारी महिलेला शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणणार्‍यास अटक

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून विना मास्क आलेल्या एका व्यक्तीला पावती करण्यास सांगितल्याने दुचाकीस्वाराने पोलीस कर्मचारी महिलेला शिवीगाळ केली. तसेच ‘मी पावती करणार नाही. तुला काय करायचे ते कर. माझ्याकडे रोज 50 पोलीस येतात’, असे म्हणत हुज्जत घातली. याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) सायंकाळी सहा वाजता रहाटणी फाटा येथे घडली.

राजू प्रकाश भाटी (वय 36, रा. उषा मनोहर सोसायटी, औंधगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत महिला पोलीस नाईक रोहिणी सूर्यवंशी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पोलीस नाईक सांगवी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्या रहाटणी फाटा येथे वाहतूक नियमनाचे तसेच विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे काम करत होत्या. त्यावेळी आरोपी राजू त्याच्या मोपेड दुचाकीवरून (एम एच 12 / एल एन 7245) विनामास्क येताना दिसला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला थांबवून विनामास्कची पावती करण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपी राजू याने फिर्यादी पोलीस कर्मचारी महिलेला शिवीगाळ केली. तसेच ‘मी पावती करणार नाही. तुला काय करायचे ते तू कर. माझ्याकडे रोज पन्नास पोलीस येतात’, असे बोलून हुज्जत घातली.

तसेच फिर्यादी यांचे सहकारी पोलीस शिपाई पाटील यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.