Pimpri : जातीच्या आधारावर असलेली श्रमव्यवस्था माणसाला कलंकित करते – मिलिंद आव्हाड

एमपीसी न्यूज – जातीच्या आधारावर असलेली श्रमव्यवस्था ही  माणसाला कलंकित करते, जातश्रम व्यवस्थेमुळे माणसाला मानखंडनेचे जीवन जगावे लागते, (Pimpri) मानखंडनेचे जीवन जगणारे स्वाभिमानाचे जीवन जगू शकत नाहीत, त्यामुळे जातीवर आधारित श्रम व्यवस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खंडन केले आहे, असे मत दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद आव्हाड यांनी मांडले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने 11 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात “रुपयाची समस्या- एक असंबोधित आर्थिक प्रश्न” या विषयावर आधारित चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा मुख्य संयोजक डॉ. पवन साळवे, विशेष अधिकारी किरण गायकवाड,  कामगार नेते गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, उत्तम कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे, बापूसाहेब गायकवाड, संजय बनसोडे, बापूसाहेब माने, विनायक गायकवाड, राम बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थीत होते. यावेळी दिल्ली विद्यापीठाचे प्रा.लक्ष्मण यादव हे  झूम मिटिंगच्या माध्यमातून जोडले गेले होते.

डॉ. मिलिंद आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी जीवनभर केलेल्या विविध चिकित्सक संशोधनाचे प्रतिबिंब उमटले आहे.  ब्रिटिशांनी चालवलेली रयतवारी, जमीनदारी कर प्रणाली ही अन्यायकारक असून ती शोषणावर आधारित आहे.  त्यामध्ये शेतक-याचा विचार केलेला नाही त्यामुळे भारतातला शेतकरी देशोधडीला लागला आहे. असे लिखाण बाबासाहेबांनी  आपल्या संशोधनात केले आहे.(Pimpri) तसेच आर्थिक प्रगतीचे मुळ हे जातश्रम व्यवस्थेमध्ये आहे. जातीच्या आधारावर असलेली श्रमव्यवस्था ही  माणसाला कलंकित करते, या जातश्रम व्यवस्थेमुळे माणसाला मानखंडनेचे जीवन जगावे लागते, मानखंडनेचे जीवन जगणारे स्वाभिमानाचे जीवन जगू शकत नाहीत, त्यामुळे ही श्रमव्यवस्था व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीला बाधा ठरते, त्यामुळे बाबासाहेबांनी महार वतने बंद केली.

 

कामगारांना योग्य मोबदला मिळाल्याशिवाय आर्थिक समता प्रस्थापित होणार नाही असे असेही बाबासाहेबांनी आपल्या संशोधनात लिखाण केले आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर नवउदारमतवादी युगात बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे.   बाबासाहेबांचा  विचार “गुडसेन्स” म्हणून नाही तर “कॉमनसेन्स” म्हणून रुजविला पाहीजे, असे मत देखील डॉ. आव्हाड यांनी मांडले.

डॉ. वामन गवई म्हणाले, चलनात गरजेपेक्षा अधिक चलन अथवा पैसा बाजारात आल्यास त्याचे मूल्य कमी होते. पर्यायाने रुपयाची क्रयशक्ती कमी होते. रुपयाची खरेदी क्षमता कमी झाल्याने चलनवाढीच्या चक्रामध्ये कामगार, कारागीर, गरीब सामान्य माणूस भरडला जातो, परिणामी सामान्य माणसाच्या जीवनमानाचा दर्जा खालावतो. त्यासाठी चलनवाढ नियंत्रित करणारी संस्था आणि यंत्रणा सरकारपासून स्वायत्त (Pimpri) असावी यासाठी बाबासाहेबांनी रिझर्व बँकेची संकल्पना मांडली.  तसेच अशा आर्थिक संकटांत स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्थिर ठेवण्यासाठी सामान्य माणसाने पर्यायी व्यवसायाची व्यवस्था जीवनात कशी करावी हे  बाबासाहेबांनी त्यांच्या “द प्रॉब्लेम ऑफ रुपी” या ग्रंथात निर्देशित केले असल्याची त्यांनी सांगितले.  तसेच कृषिप्रधान देशात हंगामी रोजगार मोठे आहेत, देशातील शेती, दुष्काळ यांचा रुपयाशी थेट संबध आहे, हंगामी रोजगारात अधिक संख्येने असलेल्या रोजगार औद्योगिकीकरणाकडे वळवावे त्यामुळे निश्चित रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक स्थेर्य प्राप्त होईल, असेही त्यांनी त्यामध्ये निर्देशित केले आहे.

चर्चासत्राचे सूत्रसंचालन अॅड गोरक्ष लोखंडे यांनी केले. तर आभार विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी मांडले. दरम्यान, सायंकाळी विचारप्रबोधन पर्वात प्रा. डॉ. अविनाश नाईक यांनी यशोगाथा महासुर्याची या कार्यक्रमाने डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, तर राहूल अन्वीकर यांनी आपल्या गीतगायनाच्या माध्यमातून उपस्थितांमध्ये जल्लोष निर्माण केला. या कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.