Dr. Ramchandra Dekhane : संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

एमपीसी न्यूज : संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र अनंत देखणे (वय 66) यांचे आज (सोमवारी) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. (Dr.Ramchandra Dekhane) संध्याकाळी पूजा करीत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. रामचंद्र देखणे हे मराठी लेखक, संशोधक, भारूडकार होते.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. देखणे यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

डॉ. देखणे यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डॉ. देखणे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात प्रदीर्घ सेवा केली होती. प्राधिकरणाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. प्राधिकरणातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी साहित्य सेवेला वाहून घेतले होते.

संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत त्यांनी अनेक वर्षे पंढरपूरची वारी केली होती. महाराष्ट्रातील लोककलांचा देखील त्यांचा व्यासंग दांडगा होता. ते एकनाथी भारूड उत्तम सादर करीत असत(Dr. Ramchandra Dekhane) महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित त्यांच्या या कार्यक्रमाचे राज्यभर अनेक प्रयोग झाले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरवले होते.

त्यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले.

Blood donation : वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 801 बॅग रक्त संकलन

डॉ. रामचंद्र देखणे हे उत्तम वक्ते आहेत.(Dr.Ramchandra Dekhane) त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध विषयांवरती अनेक व्याख्याने दिली आहेत. देशविदेशांत त्यांनी केलेल्या 2100 व्या भारुडाचा कार्यक्रम 14 मे 2016 रोजी झाला. रामचंद्र देखणे हे पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. 34 वर्षांच्या नोकरीनंतर ते 2014 साली निवृत्त झाले.अंगणातील विद्यापीठ, आनंद तरंग, आनंदाचे डोही, आषाढी, गोंधळ : परंपरा स्वरूप आणि अविष्कार, गोरज जीवनयोगी, जीवनाची सुंदरता, तुका म्हणे जागा हिता, तुका झालासे कळस ही त्यांनी लिहलेली काही पुस्तके.

Dr. Ramchandra Dekhane

एमपीसी न्यूज परिवाराशी देखील त्यांचे घनिष्ठ संबंध  होते. एमपीसी न्यूज च्या अंतरंग दिवाळी अंकासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले होते. नुकत्याच झालेल्या गणेश चतुर्थीला देखील डॉ. देखणे यांनी एमपीसी न्यूज साठी विशेष लेख लिहून दिला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.