Wakad : लॉकडाऊनच्या काळात बँकेतील कर्मचाऱ्याने केला तब्बल 1 कोटी 94 लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात बँकेत कमी स्टाफ असल्याचा गैरफायदा घेऊन एका कर्मचा-याने बनावट व्हाऊचर्स आणि चेक तयार केले. सहका-यांचे बँकेचे लॉगीन वापरून एका व्यक्तीच्या कागदपत्रांच्या आधारे परस्पर बनावट चालू खाते तयार केले. तसेच काही खातेधारकांच्या खात्यातून परस्पर व्यवहार केला. याद्वारे एका कर्मचा-याने बँकेतील एक कोटी 94 लाख 83 हजार रुपयांचा अपहार केला.

हा प्रकार 2 मे ते 7 सप्टेंबर 2020 या कालावधीत सेवा विकास सहकारी बँक काळेवाडी शाखा, पिंपरी येथे घडला. कालिदास बाजीराव सुतार (वय 54, रा. काळेवाडी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कर्मचारी धीरज मकरदेव पगारो याच्यासह त्याची आई दीपा मकरदेव पगारो, वडील मकरदेव मिरचूमल पगारो (सर्व रा. वैभवनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचारी धीरज याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवा विकास सहकारी बँक काळेवाडी शाखा येथे आरोपी धीरज क्लार्क म्हणून काम करतो. लॉकडाऊनच्या काळात बँकेत कर्मचारी संख्या कमी होती. त्याचा धीरज याने गैरफायदा घेतला. बँकेतील न वापरातील बँक खात्याचे बनावट व्हाऊचर्स आणि चेक तयार केले. बँकेतील अकाउंटंट एकनाथ काटे आणि कविता मेमाणे यांच्या बँकेच्या लॉगीन चालू असलेल्या संगणकावरून बँकेतील न वापरातील डॉरमेट अकाउंट अक्टिव्ह केले.

प्रशांत शर्मा या व्यक्तीच्या परस्पर त्यांची कागदपत्रे वापरून त्यांचे नवीन बनावट चालू खाते बनवले. त्याद्वारे बनावट व्हाऊचर्स आणि चेकद्वारे व्यवहार केले. तसेच बँकेतील खातेधारक विश्वकर्मा पन्नालाल यांच्या खात्यातून 32 लाख, नामला सत्यवती यांच्या खात्यातून 24 लाख 50 हजार, अर्चना विश्वकर्मा यांच्या खात्यातून 16 लाख 33 हजार, कल्पना नायडू यांच्या खात्यातून 24 लाख रुपये, शकुंतला नखाते यांच्या खात्यातून एक कोटी 36 लाख रुपये असे एकूण 2 कोटी 32 लाख 83 हजार रुपये रोख आणि चेकद्वारे धीरज याने आरोपी आई दीपा आणि वडील मकरदेव यांच्या संगनमताने त्या रकमेचा अपहर केला.

हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर धीरज याने अपहार केलल्या रकमेपैकी 38 लाख रुपये बँकेला परत केले. मात्र उरलेले एक कोटी 94 लाख 83 हजार रुपये परत न करता बँकेची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.