Talegaon News : तळेगाव नगरपरिषद हद्दीत सुलभ शौचालयांची उभारणी करावी – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शहरात योग्य ठिकाणी लवकरात लवकर सुलभ शौचालयांची उभारणी करावी, अशी सूचना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. सामाजिक कार्यकर्ते गोकुळ किरवे, योगेश मोरे, नबीलाल आत्तार, आकाश पवार यांनी हे पत्र मुख्याधिकारी सतीश दिघे यांना दिले.

मावळ विधानसभा मतदारसंघातील असलेल्या तळेगाव औद्योगिक क्षेत्रामळे तळेगाव दाभाडे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याची प्रचीती आपल्याला तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील गाव व स्टेशन विभागात असणाऱ्या बजारपेठांमध्ये दिसून येत आहे, याकडे शेळके यांनी लक्ष वेधले आहे.

तळेगाव दाभाडे मुख्य बाजारपेठ असल्यामुळे मावळ तालुक्‍यातील व तळेगाव दाभाडे शहरालगत असणाऱ्या अनेक खेडेगावातील नागरिकांची रोजची ये-जा असते. या परिसरात महिलांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येते परंतु नगरपरिषद प्रशासनाकडून सदर ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था अद्याप झालेली नसल्याने खूप मोठी गैरसोय होत आहे, अशी खंत शेळके यांनी व्यक्त केली आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने नाईलाजाने काही नागरिकांना उघड्यावर नैसर्गिक विधी करावे लागतात. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा तसेच सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो, याविषयी आमदार शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सदर परिस्थितीचा विचार व जागेचा सर्वे करुन तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील गाव व स्टेशन विभागात योग्य त्या ठिकाणी लवकरात लवकर सुलभ शौचालयांची उभारणी करणेसाठी मुख्याधिकाऱ्यांनी संबधित विभागास आवश्यक ते आदेश द्यावेत, असे आमदार शेळके यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.