CAG Report : कोरोनामुळे अर्थव्यवस्था बिघडली मात्र कृषी क्षेत्राने तारले

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला असतानाच कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी केली असल्याचे राज्याच्या लेखा परीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने राजकोषीय तूटदेखील तीन टक्क्यांहून करण्यात यश मिळविले असल्याचे समोर आले आहे. मात्र, राज्याचा आर्थिक विकास दर तीन टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. कॅगने राज्याचे माजी अर्थमंत्री अजित पवार यांचे आर्थिक शिस्तीसाठी कौतुक केले आहे.

कॅगचा अहवाल गुरुवारी विधानसभेत सादर केला गेला. कॅगच्या अहवालानुसार, राज्यावरील कर्ज 2016-17 या वर्षात चार लाख कोटी एवढं होते. या कर्जात वाढ झाली असून आता पाच लाख 48 हजार 176 कोटी इतकं झाले आहे. कोरोनाचा आजार आणि त्याला अटकाव करण्यासाठी लावण्यात आलेला लॉकडाउन यामुळे राज्याच्या परिस्थितीवर परिणाम झाला. कोरोना महासाथीचा प्रभाव कमी होत असल्याने टप्याटप्याने निर्बंध हटविण्यात आले होते.त्याचाही आर्थिक घडामोडींवर परिणाम झाला असल्याचे कॅगने म्हंटले आहे.

कर महसूल घटला

मागील वर्षीच्या तुलनेत राज्याचा कर महसूल 13.7 टक्क्यांनी घसरला असल्याचे कॅगने म्हंटले आहे. वर्ष 2019 -20  मधील महसूल दोन लाख 83 हजार 189.58 कोटी इतका होता.तर वर्ष 2020 -21 मध्ये महसूल दोन लाख 69 हजार 468.91 कोटींवर घसरला.

कृषी क्षेत्राने तारले

कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला असताना दुसरीकडे कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेत सकारात्मक योगदान दिले. कृषी क्षेत्र या एकमेव क्षेत्रात सकारात्मक चित्र दिसून आले. राज्याच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राने 11 टक्क्यांचे योगदान दिले. तर, राज्यातील उद्योग क्षेत्रांत 11.3 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. सेवा क्षेत्र 9 टक्क्यांनी घसरले असल्याचे कॅगने नमूद केले आहे.

अजित पवारांचे कौतुक

वर्ष 2020-21 मध्ये राजकोषीय तूट तीन टक्क्यांहून खाली आणण्यास राज्य सरकारला यश आले. राजकोषीय तूट ही 2.69 टक्क्यांपर्यंत आणण्यात राज्य सरकारला यश आले. कोरोना काळात राजकोषीय तूट कमी ठेवण्यात महाविकास आघाडी सरकारला यश मिळाल्याचे कॅगने म्हंटले आहे.आर्थिक शिस्तीसाठी कॅगने अजित पवार यांचे कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.