Bhosari News : भोसरी एमआयडीसीमध्ये खड्ड्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसीमध्ये फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे अध्यक्ष अभय भोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रास्ता रोको आणि खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करीत आंदोलन करण्यात  आले. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजक आणि कामगार उपस्थित होते.

एमआयडीसीमधील टी ब्लॉक येथे मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून सकाळ – संध्याकाळ व रात्रीच्या वेळी कर्मचारी वर्ग जाताना रोज अपघात घडत आहेत. तसेच या खड्ड्यांची दुरुस्ती झाल्यानंतरही पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडत असून अतिशय निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत.एमआयडीसीमधील उद्योजक महापालिकेला मोठ्याप्रमाणात कर देतात परंतू अधिकाऱ्यांचे पूर्णपणे एमआयडीसी परिसरातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. यापुढे महापालिकेने मूलभूत सुविधा न दिल्यास कर देणे बंद करण्याचे आवाहन उद्योजकांना करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी दिला.

यावेळी उद्योजक असोसिएशनचे उपाध्यक्ष वैभव जगताप, उपाध्यक्ष उद्योजक चंद्रकांत ठक्कर, मतीन शेख, उद्योजक सोनू ओहरी, कल्याण पांचाळ, आकाश बनसोडे, संकेत थोरात आणि मोठ्या संख्येने इतर उद्योजक व कामगार वर्ग उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.