Pune : आम्ही राजीनामे देत असलो तरी मरेपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक राहणार – विशाल धनवडे

कसब्यावर भगवा फडकविण्याचा केला निर्धार, खासदार बापट, महापौर टिळक शिवसैनिकांना फोन करून धमकावत असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – आम्ही राजीनामे देत असलो तरी मरेपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक राहणार असल्याचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी सांगितले. दरम्यान, मी कसबा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा देत असून, नगरसेवक पदाचा राजीनामा देत नसल्याचे धनवडे म्हणाले.

पत्रकार संघात कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरूड मतदारसंघातील शिवसैनिक, युवासेना व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. कोणत्याही परिस्थितीत कसब्यावर भगवा फडकविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक फोन करून शिवसैनिकांना धमकावत असल्याचा आरोप धनवडे यांनी केला.

शिवसैनिकांना जेवढे धमकवाल तेवढा तो पेटून उठेल, असा इशाराही धनवडे यांनी दिला. बापट यांच्या खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही मन लावून काम केले. तसे काम महापौर मुक्ता टिळक यांनी केले नाही. कसब्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नाल्याचे पाणी घरांत तुंबले होते, तेव्हा महापौर कुठे होत्या, असा सवालही धनवडे यांनी उपस्थित केला.

युतीच्या जागावाटपात भाजपने पुणे शहरात एकही जागा न दिल्याने शिवसैनिक नाराज आहेत. शहरात शिवसेनेचे अस्तित्व जिवंत राहण्यासाठी पुणे शहरातील व कसबा मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी भाजप विरोधात कसबा मतदारसंघांत उमेदवार उभा केला आहे. ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
ज्या कसब्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्म भूमीवर भगवा फडकविल्याशिवाय आम्ही मातोश्रीवर प्रवेश करणार नाही. युती धर्म पाळण्यासाठी आपल्यावर दबाव येत असल्याने आम्हाला पक्षातून काढताना दुःख होऊ नये, यासाठी आम्ही सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी सामूहिक राजीनामा देत असल्याचे भावनिक आवाहन या राजीनामा पत्रात करण्यात आले आहे.

हा राजीनामा देत असताना, भगव्याशी कदापीही गद्दारी करणार नाही. भगवा सोडून इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. कायम उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक राहणार असल्याचे वाचन या राजीनामापत्रात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like