Express Way News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनरला आग

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (pune mumbai express way) एका कंटेनरला आग लागली. ही घटना रविवारी (दि. 13) मध्यरात्री माडप गावाजवळ मुंबई-पुणे लेनवर घडली.

एक कंटेनर मुंबईहून पुण्याकडे जात होता. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडप गावाजवळ आल्यानंतर कंटेनरला आग लागली. भर रस्त्यात आग लागल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक खोळंबली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबी कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी कंटेनर रस्त्यातून बाजूला केला आणि वाहतूक सुरळीत केली. दरम्यान कंटेनरला लागलेली आग विझवण्यात आली. कंटेनरमधील वस्तूंनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग विझवल्यानंतर कंटेनर खालापूर टोलनाक्याजवळ आणला गेला.

खालापूर टोलनाक्याजवळ आल्यानंतर कंटेनरला पुन्हा आग लागली. कंटेनर मधील सामानाची आग पूर्णपणे विझली नसल्याने ती काही काळ धुमसली आणि नंतर मोठा पेट घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

कंटेनर मधील वस्तूंना लागलेली आग धुमसत होती. त्यामुळे त्या वस्तू जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आल्या. कंटेनर चालक सुखरूप आहे. खालापूर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.