Bhosari : पोलिसांकडून त्रास व्हावा या उद्देशाने तरुणाने पोलिसांना दिला फायरिंगचा ‘फेक कॉल’

एमपीसी न्यूज – एका दिवसापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून केवळ पोलिसांकडून त्रास व्हावा या उद्देशाने एका तरुणाने त्याच्यावर दोघांनी फायरिंग केल्याचा ‘फेक कॉल’ दिला. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. पण हा कॉल फेक असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती देणाऱ्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

सनी उर्फ निखिल रामदास भोसले (वय 25, रा. गुरुनानक कॉलनी, कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या फेक कॉलरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 29) दुपारी एक वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला सनी भोसले याने फोन करून माहिती दिली की,  मुमताज मन्सुरी यांचे नातेवाईक तुषार मन्सुरी व एजाज मन्सुरी या दोघांनी सनी भोसले याच्यावर गोळीबार केला आहे. त्यानुसार भोसरी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मात्र ही माहिती खोटी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सनी भोसले याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली.

त्यावेळी सनी याने सांगितले की, मंगळवारी (दि. 28) सनी याचे तुषार आणि एजाज यांच्यासोबत भांडण झाले होते. तुषार आणि एजाज यांना पोलिसांकडून त्रास व्हावा या उद्देशाने सनी याने नियंत्रण कक्षाला खोटी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सनी विरोधात भारतीय दंड विधान कलम 182 नुसार गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.