FASTag is mandatory : 1 जानेवारी पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक

एमपीसी न्यूज : देशात नव वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून 100 टक्के टोल फास्टॅगद्वारे वसूल केला जाणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार असून सुट्ट्या पैशांची डोकेदुखीही थांबणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.

येत्या 1 जानेवारी 2021 पासून देशात सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज पडणार नाही. याचा प्रवाशांनाच फायदा होणार आहे. प्रवाशांचा सुट्ट्या पैशांची डोकेदुखी थांबणार आहेच शिवाय इंधन आणि वेळेचीही बचत होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

सध्याच्या घडीला देशात फक्त राष्ट्रीय महामार्गांवरच 80 टक्के रकमेची वसुली फास्टॅगद्वारे केली जात आहे. नव्या वर्षात तुम्ही जर बाहेर जाणार असाल आणि तुमच्या वाहनामध्ये फास्टॅग नसेल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. सध्या टोलनाक्यावर अनेकदा टॅग नसतानाच फास्टॅगच्या मार्गिकेत अनेक लोक घुसताना दिसतात. वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्यामुळे असे होत असते. मात्र, 1 जानेवारीपासून हे चित्र दिसणार नाही.

फास्टॅग म्हणजे काय

वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असते. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.