Mumbai News : औद्योगिकनगरीतील वीज समस्येवर कायमचा तोडगा काढा; आमदार महेश लांडगे यांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

एमपीसी न्यूज – औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमधील वीज समस्यांबाबत कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले आहे. महाविकास आघाडीचा धिक्कार असो. अकार्यक्षम ऊर्जामंत्री यांचा धिक्कार असो… अशा आशयाचा फलक हातात घेऊन लांडगे यांनी सरकारचे लक्ष वेधले.

याबाबच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील महापारेषण कंपनीच्या भोसरी उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बुधवारी सकाळी बिघाड झाला. यामुळे भोसरी व आकुर्डीमधील जवळपास 60 हजार ग्राहकांकडील तसे साडेसहा हजार लघुउद्योगामधील वीज गायब झाली. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महावितरण, महापारेषण कर्मचाऱ्यांकडून अत्यंत बेजबाबदारीने काम केले जात असल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. दिवसातून दोन ते चार वेळा ‘ब्रेकडाऊन’ होत असतो. यामुळे कारखान्यांचे उत्पादनही मंदावले आहे. याचा शहरातील उद्योगांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

भोसरी वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी महावितरणने जो संपर्क क्रमांक दिला आहे. तो सतत व्यस्त व नॉटरिचेबल असतो. महावितरणचे अघिकारी वीज खंडित झाल्यावर उडवा-उडवीचे उत्तर देत असतात. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. तरी पिंपरी-चिंचवड शहरातील वीज समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढावा व सर्वसामान्य नागरिकांना वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.