Secunderabad Fire : बाईक शोरुममध्ये अग्नितांडव; 8 जणांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज – तेलंगणातील सिकंदराबाद येथे सोमवारी रात्री उशिरा इलेक्ट्रिक बाईक शोरुमला भीषण आग लागली. ही आग शोरुमच्यावर असलेल्या हॉटेलमध्ये पसरल्याने किमान आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य 13 जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सात जणांचा अग्नितांडवात मृत्यू झाला. त्यापैकी काही जण हॉटेलच्या रुममध्ये जऴून मृत्यूमुखी पडले आहेत, तर आगीतून वाचविण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाल्यामुळे काही जणांनी प्राण गमवावे लागले, असे हैद्राबादचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद यांनी सांगितले.

प्राथमिक तपासानुसार, इलेक्ट्रिक बाइक शोरुममध्ये शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा संशय आहे,परिणामी एकामागून एक वाहनांचा स्फोट झाला. हॉटेल कर्मचारी व ग्राहकांनी आग आणि धूर पाहून अग्निशमन विभागाला माहीती दिली.

पोलिसांनी सांगितले की, इलेक्ट्रिक स्कूटर शोरुममध्ये रात्री 9 वाजता आग लागली आणि काही वेळातच आगीने संपूर्ण शोरुमला वेढले. शोरुमच्या वर असलेल्या रुबी हॉटेलमध्ये आग आणि धूर पसरले, तिथे किमान 25 जण वास्तव्याला होते.

शोरुममधून घनदाट धूर निघत असल्याने हॉटेल किंवा शोरुममध्ये थांबलेल्यांपैकी अनेक जण गुदमरुन बेशुध्द पडले. त्यापैकी किमान पाच जण बेशुध्द अवस्थेतच होरपळले तर काहींनी हॉटेलच्या खोल्यांमधून उडी मारली, असे पोलिसांनी सांगितले.जखमींना तत्काळ गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यातील दोघांचा मृत्यू झाला. अन्य चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फायर ब्रिगेडने हॉटेलच्या खोल्यांमध्ये अडकलेल्या 10 जणांना वाचविले, तर काहींनी स्वत:ला वाचविण्यासाठी हॉटेलमधून उडी मारल्याचं अधिकार्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.