Pune News : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चार जणांच्या टोळीला खडक पोलिसांनी अटक केली. पहाटेच्या सुमारास एका व्यापाऱ्याला लुबाडण्याचा त्यांचा डाव होता. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवमंदिर व अंबाबाई देवीच्या मंदिरातील एका जागेवरून त्यांना अटक केली आहे. 

निखिल विश्वास थोरात (वय 22), द्वारकाधीश बाबासाहेब पवार (वय 23), सुरेश रमेश भिसे (वय 20) आणि यश उर्फ आदित्य सुभाष लोंढे अशी अटक करण्यात आलेल्या या चौघांची नावे आहेत. तर त्याचे दोन साथीदार पळून गेले आहेत. पोलीस शिपाई सुनील वालकोळी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चिंचोले नावाचा बांबूचा व्यापारी हा पहाटेच्या वेळी त्याच्या दुकानांमध्ये देवपूजा करण्यासाठी येत असतो व त्याच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅश असते अशी माहिती आरोपींना मिळाली होती. याच माहितीचा गैरफायदा घेऊन त्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आरोपी एकत्र जमले होते.

त्यांच्याजवळ दोन कोयते,  एक नायलॉनची दोरी, मिरचीपूड इत्यादी दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य सापडले. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवमंदिर व अंबाबाई देवीच्या मंदिराजवळ ते दबा धरून बसले होते. पोलिसांनी यातील चौघांना अटक केली असून अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. खडक पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.