Pune News : ‘हल्दीराम फूड्सची’ फ्रॅंचाईजी देण्याच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रा. ली. या कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून त्या आधारे ‘हल्दीराम फूड्सची’ फ्रॅंचाईजी देण्याच्या आमिषाने एकाची सहा लाख 74 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

चंदननगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्कर्ष कन्हैयालाल अग्रवाल (वय 36, रा. अंकुर बंगालो, मुनूरवार सोसायटी, वडगाव शेरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रा. ली. या कंपनीची बनावट वेबसाईट तयार केली. त्यानंतर फिर्यादीशी फोनवरून संपर्क साधत त्यांना हल्दीराम फूड्सची फ्रॅंचाईजी देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीनेही त्याच्यावर विश्वास ठेवत आरोपीने सांगितल्यानुसार रजिस्ट्रेशन चार्जेस, सुरक्षा ठेव, ऍग्रिमेन्ट फी, आणि इंटरियर डिझाईन फी असे सहा लाख 74 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरले.

परंतु अनेक दिवस झाल्यानंतर ही फ्रेंचाइजी मिळत नसल्यामुळे फिर्यादीने आरोपीकडे पैशाची मागणी केली परंतु आरोपीने अद्यापही पैसे परत केले नाहीत. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.