Pimpri News : सरकारे आली, गेली पण कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत; कामगारदिनी यशवंतभाऊ भोसले यांचा हल्लाबोल

'कामगार अस्तित्व रॅली'त राज्यभरातून हजारो कामगार सहभागी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अनेक सरकारे आली, गेली पण कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत. कामगारांना न्याय मिळाला नाही. ही मोठी शोकांतिका आहे. कामगार दारात आला की मंत्र्यांच्या कपाळावर आट्या पडतात. पण, कंपनीचा मालक आला की त्यांच्यापुढे पायघड्या घातल्या जातात. सहा-सहा महिने आंदोलने करुनही कामगारांना न्याय मिळत नाही. मालकांना मात्र न्याय मिळतो. अधिका-यांच्या हातात देश गेला आहे. मंत्री त्यांना पाहिजे ते काम अधिका-यांकडून करुन घेतात. त्यांना समाजाचे काही घेणेदेणे नाही”, असा घणाघात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले कामगारदिनी केला.

धार्मिक आरोप-प्रत्यारोप, राजकीय दंगा थांबवून श्रमिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे कामगारदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात भव्य ‘कामगार अस्तित्व रॅली’ काढली. राज्यभरातून हजारो कामगार या रॅलीत सहभागी झाले होते.

संत तुकारामगर येथे झालेल्या सभेला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश जेधे, अनिल कोंडे, उद्योजकांचे अध्यक्ष दिपक पाटील, राहुल शितोळे, अनिकेत भोसले, एकनाथ गायकवाड, साहेबराव भोसले, अमोल कार्ले, सिद्धार्थ कारखे, स्वानंद राजपाठक, उत्तमराव वाघमारे, दत्ता गायकवाड, सतिश एरंडे, नंदू खैरे, विलास ठोंबरे, हनुंमत जाधव, संजय साळुंखे, विठ्ठल ओझरकर, आबा खराडे, शंकर गावडे, दिपक पलंगे, संतोष टाकळे यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कामगारांना मार्गदर्शन करताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, ”अनेक कारखान्यांमध्ये कामगारांवर अन्याय झाला. कामगारांच्या मागण्यासाठी आंदोलनासह न्यायालयीन लढाई देखील लढलो. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तरी, त्याच्या अमंलबजावणीस कंपन्यांकडून टाळाटाळ केली जाते. आंदोलन करायचे म्हटले तर उद्योजक कंपनीच्या गेटवर आंदोलन करुन देत नाहीत. न्यायालयात कामगारांच्या बाजूने निकाल लागला. तर, वरच्या न्यायालयात पाठविले जाते. पोलीस सहकार्य करत नाहीत. कामगारांच्या याचिकांवर न्यायालयात 25 -25 वर्षे तारखा पडतात. निकाल लागायला मोठा विलंब होतो. निकाल लागल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा अंमलबजवणी करत नाहीत, हे कामागरांचे दुर्देव आहे. रॅलीला कामगारांनी मोठा प्रतिसाद देऊन कामगारअभी जिंदा है, कामगार एक तळपती तलवार असल्याचे सरकारला दाखवून दिले”.

”या देशाला क्रातिकांराचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यापूर्वी देशभक्त जन्माले. पण, स्वातंत्र्यानंतर देशाच्या 75 वर्षानंतर एकही नेता श्रमिकांसाठी जन्माला आला नाही, ही मोठी शोकांतिका आहे. राजकारण्यांनी समाजाचे प्रश्न सोडविणे, त्यांना न्याय देण्याऐवजी लोकांना धर्मांत गुंतवूण ठेवले जात आहे. मृत्यू हा अढळ, अटळ आहे. मृत्यूनंतर आपण कोणत्या धर्मात जातोल, याची कल्पना नाही. धर्मा-धर्माच्या नावाखाली द्वेष पसरुन मतांचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी धार्मिक वादात गुंतून राहू नये. मतासाठी पैसे, दारु घेणे बंद करावे. त्याशिवाय नागिरकांना स्वातंत्र्याचा अर्थ कळणार नाही. समाजाने त्यागाची मूर्ती व्हावी. राजकारण्यांपुढे लोटांगण घालू नका, एकत्रित, एकजुट रहावे” अशी अपेक्षाही यशवंतभाऊ भोसले यांनी केली. तसेच ”कोरोनामुळे आंदोलने थांबली होती. येत्या 15 दिवसात पोलिसांची परवानगी घेऊन कामगारांवर अन्याय करणा-या कंपन्यांच्या गेटवर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

उस्मानाबादच्या जिल्हाधिका-यां विरोधात न्यायालयात अवमान याचिका

”तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीची सुरक्षा करणा-या कामगारांना किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी मिळत नाहीत. याबाबत मी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने कामगारांना किमान वेतन, साप्ताहिक सु्टटी देण्याचे आदेश दिले. पण, देवस्थानचे अध्यक्ष असलेले उस्मानाबादचे जिल्हाधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. सनदी अधिका-यांना ठेकेदांरासोबत बैठका घ्यायला वेळ आहे. पण, श्रमिकांबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करायला वेळ नाही. न्यायालयाच्या निकालाला केराची टोपली दाखविली जाते. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हाधिका-यां विरोधात औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. आई तुळजाभवानीच्या आर्शिवार्दाने कामगारांना नक्की न्याय मिळेल”, असा विश्वास यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केला.

राज्यभरातून 3 हजार कामगार रॅलीत झाले सहभागी

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या संत तुकारामनगर येथील कार्यालयापासून सकाळी 10 वाजता भव्य रॅलीला सुरुवात झाली. हजारो कामगार रॅलीत सहभागी झाले होते. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. संत तुकारामगर पोलीस चौकी समोरुन -नेहरुनगर चौक-कामगारनगर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात रॅली आली. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तेथून पिंपरी चौक-कामगारनगर-नेहरुनगर-संत तुकाराम महाराज पोलीस चौकीसमोरुन संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान येथे रॅलीची सांगता झाली. सुमारे 300 दुचाकी, टेम्पो, ट्रक, कार, अॅटो या वाहनांच्या माध्यमातून 3 हजार कामगार या रॅलीत सहभागी झाले होते. सुमारे अडीच तास ही रॅली चालली. संत तुकारामनगर येथे रॅलीचे सभेत रुपांतर झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.