Pune : ‘एचसीएमटीआर’ पुणेकरांसाठी मारक की तारक चर्चासत्रात अधिकारी धारेवर

एमपीसी न्यूज – सजग नागरिक मंचतर्फे आयोजित ‘एचसीएमटीआर’ पुणेकरांसाठी मारक की तारक ’ या चर्चासत्रात पुणेकरांनी सत्ताधाऱ्यांसह महापालिका अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. त्यामुळे पुणे महापालिकेचे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे आणि भाजपचे स्वीकृत सभासद गोपाल चिंतल यांना काही वेळ बोलताच आले नसल्याचे चित्र दिसून आले. तत्कालीन भाजपच्या राज्य शासनाने हा प्रकल्प अतिशय प्रतिष्ठेचा केला आहे. एक ही पैसा देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण, पुणे महापालिकेची एवढी आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे आर्थिक डोलारा कोसळण्याची भीती आहे. 

एचसीएमटीआर प्रकल्प पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी फायदेशीर असल्याचे रविवारी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. मात्र, उपस्थित नागरिकांचे आलेले प्रश्न व खुलाशांची उत्तरे देण्यास त्यांना सपशेल अपयश आले. हा प्रकल्प शहरासाठी किती महत्वाचा आहे, त्यासाठी किती कमी खर्च होईल, याचे सादरीकरण करण्यात आले.

सहभागी झालेल्या सारंग यादवाडकर, प्रशांत ईनामदार, अ‍ॅड़ रितेश कुलकर्णी यांच्यासह उपस्थित नागरिकांनी आपली बाजू मांडली. हा प्रकल्प तारक की मारक नव्हे तर ठार मारक असल्याचे पुराव्यानिशी सादरीकरण केले़. या प्रकल्पावर हरकती, सूचना मागविण्याचे काम सुरू झाले आहे, असे सांगण्यात आले. हा प्रकल्प अद्याप अंतिम झालेला नाही. शहर सुधारणा समिती, स्थायी समिती आणि मुख्य सभा या प्रकल्पा संदर्भात निर्णय घेणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र, उपस्थित नागरिकांचे समाधान झाले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.