Hinjawadi News : पिंपरी चिंचवड पोलीस भरती परीक्षा; मास्क कॉपी प्रकरणात औरंगाबादच्या एका पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत एका बहाद्दराने मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावून परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या परीक्षार्थीला औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यातील एक कॉन्स्टेबल मदत करणार होता. या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी औरंगाबाद येथून संबंधी पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

राहुल उत्तम गायकवाड (वय 33, रा. मिल कॉर्नर, पोलीस वसाहत) असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. गणेश रामभाऊ वैद्य (वय 25, रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. वैद्य हा परीक्षार्थी होता. गायकवाडने त्याला मदत कारण्यासाठी दोघांनी हा हायटेक कॉपीचा प्रयत्न केला होता.

19 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील शिपाई पदाच्या 720 जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. हिंजवडी येथील एका परीक्षा केंद्रावर वैद्य याचा नंबर आला होता. सर्व परीक्षार्थींना तपासून परीक्षा केंद्रावर सोडत असताना पोलीस नाईक शशिकांत देवकांत यांच्या एक परीक्षार्थी निदर्शनास आला. त्या परीक्षार्थीच्या चेह-यावर असलेला मास्क मोठा आणि जाड असल्याने पोलिसांनी त्याला हटकले. मात्र आपले ओळखपत्र बागेत विसरले असल्याचा बनाव करून परीक्षार्थी वैद्य तिथून पळाला. दरम्यान पोलिसांनी त्याचा मास्क ताब्यात घेतला. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने परीक्षा केंद्रावरून धूम ठोकली.

वैद्य याच्या मास्कमध्ये एक सिमकार्ड, बॅटरी आणि अन्य तांत्रिक साहित्य आढळून आले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरुवातीला नितीन जगन्नाथ मिसाळ (वय 26), रामेश्वर दादासाहेब शिंदे (वय 24, दोघे रा. औरंगाबाद) या दोघांना अटक केली होती. पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड हा वैद्यला मदत करणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.