Hinjawadi : तरुणाला लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले

तीन आरोपींकडून दोन गुन्ह्यांची कबुली

एमपीसी न्यूज – नोकरीच्या शोधात शहरात आलेल्या परप्रांतीय तरुणाला मारहाण करून दोन जणांनी त्याच्याजवळील मोबाईल व पाकीट चोरून नेले. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी लुटारूंचा पाठलाग करून त्यांना पकडले. ही घटना भुजबळ चौक येथे बुधवारी (ता. 31) पहाटे घडली.

पील्ली चरण तेजा वेंकटेश्‍वरू पील्ली (वय 27, रा. ओगोल, प्रकाशम, आंध्र प्रदेश) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिकेत भाऊसाहेब पवार (वय 22, रा. विद्यासागर अपार्टमेंट, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि शिवलिंग कसबे (रा. बिजलीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पील्ली हे नोकरीच्या शोधात बंगरूळवरून पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. गुरुवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास वाकड पुलाखाली ते उतरले. हिंजवडी येथे जाण्यासाठी ते रिक्षाची वाट पाहात उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी पिल्ली यांना मारहाण करून खिशातील पाकीट आणि मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची झटापट सुरू असताना त्याठिकाणी खासगी मोटारीतून सहायक निरीक्षक गणेश धामणे, पोलीस कर्मचारी किरण पवार, आतिक शेख, कुणाल शिंदे, सुभाष गुरव आले. पोलीस आल्याचे पाहताच कसबे याने धूम ठोकली तर पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदाराचे नाव आणि पत्ता सांगितला.

आरोपी पवार याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने रवींद्रनाथ शिवाजी हांगे (वय 26) याच्या मदतीने आणखी एक लुटमारीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी हांगे याला अटक केली. त्या गुन्ह्यात लुटलेल्या ऐवजाची पाहणी करताना त्यांना फिर्यादीचा पत्ता सापडला. त्यानुसार प्रीतम दिलीप काशीद (वय 22, रा. इमिरस सोसायटी, बाणेर) या विद्यार्थ्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मंगळवारी (ता. 29) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपी पवार आणि हांगे यांनी प्रीतम याला ‘तुझ्या गाडीने माझ्या गाडीस ठोकले’ असा बहाणा करीत मारहाण करून खिशातील एक हजार रुपये लुटून नेले होते. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.