Hinjawadi : आयटी अभियंत्याला सोसायटी कार्यालयात डांबून पावणेपाच लाखांना लुटले

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये भाड्याने राहणा-या आयटी अभियंत्याला चौघांनी मिळून सोसायटीच्या कार्यालयात डांबून ठेवले. त्याच्या क्रेडिट, डेबिट कार्डवरून पैसे ट्रान्स्फर करून तसेच त्याच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज घेऊन त्याला लुटले. ही घटना रविवारी (दि. 2) दुपारी चारच्या सुमारास हिंजवडी येथील ब्लुरीच सोसायटी येथे घडली.

संदीप नरसिंहराव तल्लुरी (वय 32, रा. हिंजवडी) या आयटी अभियंत्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अंगज, रिझवान, शागुत्ता अब्दुल करीम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हिंजवडी येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. ते हिंजवडीमधील ब्लुरीच सोसायटी येथे भाड्याने राहतात. त्यांचे काही सामान सोसायटीच्या कार्यालयात राहिले होते. ते घेण्यासाठी संदीप सोसायटीच्या कार्यालयात गेले. त्यावेळी चार आरोपी तिथे होते.

आरोपींनी संदीप यांना डांबून ठेवले. त्यांच्या ऍक्सिस बँकेच्या डेबिट कार्डमधून 90 हजार, आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्डमधून एक लाख, क्रेडिट कार्डमधून 1 लाख 90 हजार रुपये बेदी गेस्ट हाऊस पुणे या खात्यावर ट्रान्स्फर करून घेतले.

  • तसेच संदीप यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी आणि रोख रक्कम देखील आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतली. एकूण 4 लाख 70 हजार रुपये काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.