Hinjawadi : ब्रेक फेल झालेल्या मिक्सरची दुचाकीला धडक; हिंजवडी-माण मार्गावर वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज – ब्रेक फेल झालेल्या मिक्सरने आयटी अभियंता तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. ही घटना आज (मंगळवारी) रात्री साडेसातच्या सुमारास हिंजवडी येथे माण रोडवर पांडवनगर फाट्यावर घडली. हिंजवडी पोलिसांनी मात्र या घटनेचा दुजोरा दिला नाही.

याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, माण-हिंजवडी रस्त्यावरून जात असताना विप्रो कंपनीच्या मागच्या बाजूला पांडवनगर फाट्यावर वळताना सिमेंट मिक्सरचा ब्रेक फेल झाला.

दरम्यान, हिंजवडीमधील एका आयटी कंपनीतील अभियंता मोपेड दुचाकीवरून जात होता. मिक्सरने दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिली. यामध्ये दुचाकी मिक्सरच्या खाली गेली. दुचाकीस्वार प्रसंगावधान राखत मिक्सरच्या बाजूला आला. यामुळे दुचाकीस्वार तरुणाचे प्राण वाचले. मात्र, या अपघातात आयटी अभियंता किरकोळ जखमी झाला आहे.

दरम्यान, हिंजवडी-माण मार्गावरील दोन्ही बाजूला वाहतूककोंडी झाली. हिंजवडी वाहतूक विभागाचे कर्मचारी व हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक कोंडी सोडवली जात आहे.

हिंजवडीसह पिंपरी-शहर आणि परिसरात मंगळवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यातून वाहन चालक वाट काढत आहेत. साचलेले पाणी आणि पावसाची संततधार यामुळे हिंजवडीमधील सर्वच मार्गावर वाहतूककोंडी झाली आहे. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची धावपळ सुरु आहे. हिंजवडी पोलिसांनी मिक्सर चालकाला पोलीस ठाण्यात नेले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.