CSK vs RCB : अखेर चेन्नई एक्सप्रेस ला मिळाला पहिला विजय

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : आज काहीही झाले तरी विजय मिळवायचाच या जिद्दीने चेन्नई संघ मैदानात आज उतरला आणि जे ठरवले ते सत्यात उतरवून दाखवताना बंगलोर संघावर 23 धावांनी विजय मिळवत  यावर्षी च्या आयपीएल मधला आपला  पहिला विजयही प्राप्त करताना दोन अंक मिळवून आपले गुणांचे खातेही उघडले आहे.

या विजयात 95 धावांची नाबाद खेळी करणारा डावखुरा शिवम दुबे सामन्याचा मानकरी ठरला आहे.
टाटा आयपीएल 2022 चा आजचा बाविसावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर झाला, ज्यात डूप्लेसीने नाणेफेक जिंकून प्रथम चेन्नई संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले खरे,पण लागोपाठच्या चार पराभवाने डिवचल्या गेलेल्या आणि आपली प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सीएसके संघाने या आमंत्रणाचा सहर्ष स्विकार करत आपल्या निर्धारित 20 षटकात फक्त 4 गडी गमावून 216 धावांचा विशाल डोंगर उभा करून बंगलोर संघापुढेच रॉयल चॅलेंज उभे केले असे म्हटले तर त्यात काहीही गैर असणार नाही.

खरे तर चेन्नईच्या डावाची सुरुवात जराही चांगली झाली नाही, खराब फॉर्म मधुन जाणारा युवा ऋतूराज आजही आपल्या खराब कामगिरीला बदलवू शकला नाही आणि तो 17 धावा करुन हेजलवूडच्या गोलंदाजीवर पायचीत झाला,त्यानंतर आक्रमक शैलीचा मोईन  अली सुद्धा फक्त 3 धावा करुन धावबाद झाला तेंव्हा चेन्नई संघाची अवस्था 7व्या षटकात दोन बाद 36 अशी झाली होती, यावेळी बंगलोर संघ जोशात वाटत होता आणि चेन्नई पुन्हा एकदा निराश.

पण आज चेन्नईच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रतिष्ठेचा विषय असल्याने त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच 120 व्या चेंडूपर्यंत लढण्याची तयारी ठेवली होती, आणि यावेळी गड सांभाळणारे मावळे होते ते म्हणजे रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे.या जोडीने आधी परिस्थितीचा अंदाज घेत आपला जम बसवला आणि नंतर बंगलोर संघाच्या सर्वच गोलंदाजांवर तुफानी हल्ला करत मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर ऐन एप्रिलच्या रखरखीत उन्हात तुफानी पावसाची बरसात केली,( म्हणजेच धावांची,) या दोघांनी षटकार आणि चौकाराचीच भाषा करत 71 चेंडूत 165 धावांची तुफानी भागीदारी करून संघाला एका मोठया धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करुन दिली.

आपापले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करुन हे दोघेही आपल्या शतकाकडे वाटचाल करत आहेत असे वाटत असतानाच रॉबिन उथप्पा  50 चेंडूत 88 धावा काढून हसरंगाच्या गोलंदाजीवर कोहलीच्या हातात झेल देवून बाद झाला,या 88 धावांमध्ये 9 उत्तुंग षटकार आणि चार चौकार सामील होते, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हसरंगाने जडेजाला भोपळाही न फोडू देता झेलबाद करून बंगलोर संघाला थोडीफार का होईना पण राहत दिली, पण ती क्षणिकच ठरली कारण दुसऱ्या बाजूने शिवम दुबे आज अतिशय स्फोटक अंदाजात खेळत होता.

आपले आयपीएल मधले तिसरे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पहिल्या शतकाला तो सहज गाठेल असे वाटत असतानाच तो डावाच्या शेवटच्या चेंडूवर  फक्त एकच धाव काढू शकला ज्यामुळे तो 95 धावांवर नाबाद राहिला.त्याने फक्त 46 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकार मारत आपल्या आजपर्यंतच्या करीयरमधल्या सर्वाधिक 95 धावा काढल्या. या तुफानी टोलेबाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जने आपल्या 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 216 धावांचे विशाल लक्ष्य उभे केले.

बंगलोर संघाची फलंदाजीतली खोली बघता या धावा ते गाठतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना असली तरी चेन्नई संघाच्या चाहत्यांना मात्र आपल्या गोलंदाजांवर ठाम विश्वास वाटत होता. आणि खरोखरच चेन्नईच्या गोलंदाजांनी आज तरी आपल्या चाहत्यांना निराश केले नाही.217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगलोर संघाची सुरुवात रॉयल तर सोडाच साधी चांगली सुद्धा झाली नाही, डूप्लेसी (8) ,अनुज रावत(12) आणि कोहली (1)अशी रथी महारथी मंडळी अतिशय स्वस्तात बाद झाल्यानंतर बंगलोर संघाची अवस्था  6 षटकात तीन बाद 40 अशी झाली होती, त्यात फक्त 10 धावांची भर पडलेली असतानाच ग्लेन मॅक्सवेल सुध्दा 26 धावांची छोटी पण स्फोटक खेळी करून बाद झाला आणि चेन्नई संघ आज पराभवाची मालिका खंडित करणार असे वाटायला लागले होते.

याचवेळी शाहबाज अहमद आणि  आपल्या पहिल्याच सामन्यात खेळणारा युवा सुयश प्रभूदेसाई ही जोडी एकत्र आली आणि त्यांनी लढाई चालू ठेवताना पाचव्या गड्यासाठी  60 धावांची चांगली भागीदारी करून आम्ही कुठल्याही परिस्थितीत पराभव सहजासहजी स्विकारणार नाहीत असाच संदेशही दिला.मात्र ही जमलेली जोडी तोडली ती महिश तीक्ष्णानाने, त्याने सुयश 34 धावांचे सुयश लाभलेले असताना त्रिफळाबाद केले ,त्यानंतर थोडयाच वेळात त्याने शाहबाज अहमदलाही क्लीन बोल्ड करत चेन्नई संघासाठी विजयाचे दरवाजे जवळपास उघडलेच.

यानंतर लगेचच हसरंगा आणि आकाशदीप बाद झाले आणि बंगलोर संघाची अवस्था 16 व्या षटकाखेरीस आठ बाद 146 झाली,यानंतर दिनेश कार्तिकने थोडाफार प्रतीकार केला खरा पण तो यशस्वी ठरला नाही ,त्याची आक्रमक 34 धावांची खेळी जडेजाच्या सुंदर झेलामुळे समाप्त झाली आणि त्यानंतर बंगलोर संघाच्या विजयाची आसही. लागोपाठ चार सामने पराभूत झाल्यानंतर टाटा आयपीएल 2022 मधला आपला पहिला विजय मिळवताना चेन्नई संघाने बंगलोर संघावर 23 धावांनी विजय मिळवला,आरसीबी संघासाठी हा दुसरा पराभव ठरला.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज
20 षटकात 4 बाद 216
उथप्पा 88,पांडे नाबाद 95,गायकवाड 17
हेजलवुड 33/1,हसरंगा 35/2
विजयी विरुद्ध

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
20 षटकात 9 बाद 193
डूप्लेसी 8,रावत 12,कोहली 1,मॅक्सवेल 26,शाहबाज 41,सुयश 34,कार्तिक 34
जडेजा 39/3,महीश तीक्ष्णा 33/4,ब्रावो 42 /1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.