IND vs Hong Kong : भारतीय संघाचा हॉंगकॉंग संघावर दणदणीत विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) नवख्या हॉंगकॉंग संघावर मोठा विजय मिळवून भारतीय संघ सुपर चार मध्ये दाखल झाला आहे.(IND vs Hong Kong) आशिया कप 2022 मधल्या आजच्या चौथ्या आणि भारतीय संघाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने हॉंगकॉंग संघाला 40 धावांनी पराभूत करत आपला सलग दुसरा विजय मिळवून आपली विजयी घोडदौड चालूच ठेवली आहे.

हॉंगकॉंग संघाचा कर्णधार निझाकत खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले खरे,पण मजबूत भारतीय संघाने हा निर्णय चुकीचा ठरवत आपल्या निर्धारित 20 षटकात तब्बल 192 धावा चोपल्या.भारतीय संघाचा महत्वपूर्ण खेळाडू विराटला गवसलेला फॉर्म आणि सुर्यकुमार यादवची झंझावाती फलंदाजी हे भारतीय डावाची खास वैशिष्ट्ये ठरली.

आज रोहीतने पहिल्या सामन्याचा मानकरी ठरलेल्या हार्दिकला विश्रांती देताना ऋषभ पंतला संघात स्थान दिले, विश्वकप जवळ आलेला आहे, त्यादृष्टीने संघ व्यवस्थापन प्रत्येकाला आजमावत आहे हे मान्य,पण म्हणून अष्टपैलू हार्दिक पंड्याला बाहेर बसवणे हा निर्णय पटला नाही,(IND vs Hong Kong) पंड्या आता त्याच्या अतिशय अशा उत्तम आणि भन्नाट फॉर्मात आहे, अशा वेळी त्याला जास्तीत जास्त संधी देणे जास्त योग्य होते,असे बऱ्याच क्रीडा समालोचकांचे मत होते.

भारतीय डावाची सुरुवात रोहीत आणि के एल राहुल यांनी केली. आज रोहितने आपले खाते उघडताच टी-20 फॉरमॅट मध्ये साडेतीन हजार धावा करणारा पहिला फलंदाज होण्याचा आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला, त्याने नेहमीच्या धडाकेबाज अंदाजात फलंदाजीला सुरुवात केली खरी,पण 13 चेंडूत 21 धावा करुन तो आयुष शुक्लाच्या गोलंदाजीवर बाद झाला, त्यानंतर खेळायला आला तो विराट कोहली, (IND vs Hong Kong) त्याने के एल राहुल सोबत डाव पुढे चालू ठेवताना आश्वासक फलंदाजीला सुरुवात केली, त्याची देहबोली आज अतिशय सकारात्मक होती, बघताबघता या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 56 धावांची अर्धशतकी भागीदारी ही पूर्ण केली, राहूललाही सुर  गवसतोय असे वाटत असतानाच तो 36 धावावर असताना गझनफरच्या गोलंदाजीवर बाद झाला,त्याने 39 चेंडूत 36 धावा केल्या,ज्यात दोन षटकार होते, या जोडीने 56 धावा जरी जोडल्या होत्या, तरीही धावांची सरासरी फारसी चांगली नव्हती, क्रिकेट खेळाची अनिश्चितता पाहता ससा वाघाची शिकार करेल का अशी आशंका कितीही नाही म्हटली तरी मनाला शिवून गेली.

Today’s Horoscope 1 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पण या नंतर दुबईच्या आलिशान मैदानावर घोंघावत आले ते एक वादळ,नैसर्गिक परवडले पण असे नको अशी अवस्था त्याने नवख्या हॉंगकॉंग संघाच्या गोलंदाजांची केली, ते म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून ते होते सुर्यकुमार यादव नावाचे भारतीय संघातले फलंदाजीचे नवे पण आश्वासक नाव, (IND vs Hong Kong)त्याने मैदानावर आल्यापासूनच जी तोडफोड सुरु केली ना,की ज्याचे नाव ते,यादवाच्या या सूर्याच्या अशा तळपण्याने हॉंगकॉंग संघाचे गोलंदाज इतके हतबल झाले की त्यांच्या डोळ्यासमोर खरोखरच काजवे चमकले असावेत,सुर्यकुमारच्या या तुफानी खेळीपुढे विराटचे 31 वे अर्धंशतकही फिके पडले, खरेतर कोहलीला 50/100 धावा म्हणजे जणु हातचा मळ अशी परिस्थिती मागिल तीन वर्षांपूर्वीपर्यंत होती, पण जगातल्या प्रत्येक महान खेळाडूच्या वाट्याला येतो तसा(सर डॉन ब्रॅडमन सोडले तर)एक बॅडपॅच त्याच्याही वाट्याला आला आणि त्यामुळेच कोहलीला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे,त्याच कोहलीचे आजचे  टी-20 मधले 31 वे अर्धशतक आले,पण त्याला काहीसे नाही तर संपूर्णपणे झाकून टाकले ते सुर्यकुमार यादवच्या तुफानी फलंदाजीने.

त्याने फक्त 26 चेंडूत सहा षटकार आणि  तेवढेच चौकार मारत वेगवान 68 धावा केल्या,तर कोहलीने 44 चेंडूत 1 चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद 59 धावा केल्या, साहजिकच या तोडफोड भागीदारीमुळे भारतीय संघाने 192 धावांचे विशाल लक्ष्य नवख्या हॉंगकॉंग संघापुढे ठेवले,(IND vs Hong Kong) भारतीय डाव संपल्यानंतर तंबुत नाबाद परत जात असताना विराट कोहलीने अतिशय मोठ्या मनाने मान झुकवून सुर्यकुमार यादवच्या या खेळीचे दिलखुलास कौतूक ही केले.या जोडीने 42 चेंडूत 98 धावांची वेगवान भागीदारी केली, ज्यामुळे भारतीय संघाला 193 धावांचे मोठे लक्ष्य हॉंगकॉंग संघाला देता आले. या विशाल लक्ष्याचा पाठलाग कऱताना हॉंगकॉंग संघाची दमछाक होणार,याबद्दल कोणाच्याही मनात कसलीच शंका नव्हती.

अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्याच षटकात यासीमला बाद करुन त्यांना पहिला धक्का दिला.यानंतर निझाकत खान आणि बाबर हयात यांनी बऱ्यापैकी प्रतिकार करत दुसऱ्या गड्यासाठी 39 धावांची भागीदारी करत लढाई सुरु राहील असा संदेश दिला,पण कर्णधार निझाकत खान वैयक्तिक दहा धावांवर असताना जडेजाच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामूळे धावबाद झाला,आणि हॉंगकॉंग संघाला आणखी एक मोठा हादरा बसला.(IND vs Hong Kong) त्यानंतर बाबर हयातने आक्रमक अंदाजात खेळत डाव पुढे सुरू ठेवला खरा पण त्याची खेळी जडेजाने 41 धावांवर समाप्त करून भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले,भारतीय गोलंदाजाच्या अनुभवी माऱ्यामुळे नवखा हॉंगकॉंग संघ अधिकच गर्तेत येत गेला,त्यामुळे भारतीय संघ किती धावा राखून जिंकणार हाच सवाल होता.

मात्र किंचित शाह ,झिशान अली,एजाज खान,स्कॉट मँकेंनी यांच्या प्रतिकारामुळे हॉंगकॉंग संघाने भारतीय गोलंदाजीचा सामना करत आपल्या 20 षटकात फक्त 5 गडी गमावून 152 धावा करण्यात यश मिळवले, मात्र त्यांच्या या चिवट प्रतिकारामुळे त्यांनी मैदानावर उपस्थित असलेल्या असंख्य रसिकांची मने नक्कीच जिंकली.(IND vs Hong Kong)अर्थात सामना मात्र भारतीय संघाने 40 धावांनी जिंकुन सुपर चार मधले आपले स्थानही पक्के केले. सुर्यकुमार यादवला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
भारत
2 बाद 192
राहुल 36,रोहीत 21,कोहली नाबाद 59,सुर्यकुमार यादव नाबाद 68
विजयी विरुद्ध
हॉंगकॉंग
5 बाद 192
बाबर हयात 41,किंचित शाह 30,झीशान अली नाबाद 26,मँकेंनी नाबाद 16
भुवनेश्वर 15/1,जडेजा 15/1,अर्शदीप 44/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.