Ind vs Aus T20 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर ; सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पदाची सूत्रे

एमपीसी न्यूज – आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर ट्वेंटी-ट्वेंटी संघाची बांधणी ( Ind vs Aus T20) करण्याच्या दृष्टीने येत्या 23 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ट्वेंटी-ट्वेंटी मालिकेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी- ट्वेंटी मालिकेसाठी वन डे वर्ल्ड कप 2023 या संघात खेळलेल्या अनेक वरिष्ठ खेळाडूंसह इतर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, के एल राहुल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव , शुभमन गिल, मोहम्मद सिराज यांना आराम देण्यात आला आहे. तसेच श्रेयस अय्यर याला देखील पहिल्या तीन सामन्यांसाठी आराम देण्यात आला आहे.
 भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा विश्वचषकात जायबंदी झाल्याने ट्वेंटी-ट्वेंटी मालिकेसाठी ( Ind vs Aus T20) सूर्यकुमार यादव याच्याकडे कर्णधार पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, यष्टीरक्षक जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, हर्षदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार या खेळाडूंचा समावेश आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँक ट्वेंटी-ट्वेंटी मालिकेत एकूण 5 सामने खेळण्यात येणार आहेत. दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी भारताचा ऑस्ट्रेलियाशी पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना तिरूअनंतपुरम येथे 26 तारखेला रंगणार आहे. तिसरी लढत 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे होईल. चौथा सामना 1 डिसेंबर रोजी रायपूर येथे खेळवला जाणार आहे. तसेच 3 डिसेंबर रोजी पाचवा सामना बेंगलोर येथील चिन्नस्वामी मैदानावर होणार आहे.
 या संघात श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यासाठी उपकर्णधार म्हणून सामील ( Ind vs Aus T20)  होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.