India Corona Update: गेल्या 24 तासांत विक्रमी 7964 नवे रुग्ण, कोरोनामुक्तांची टक्केवारी 47 च्या पुढे

India corona update: The highest 7964 new patients in the last 24 hours while overall corona free patients percentage rises up to 47

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत 7 हजार 964 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे देशातील बाधितांची एकूण संख्या 1 लाख 73 हजार 763 वर जाऊन पोहचली आहे.  एकाच दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच देशातील कोरोनामुक्तांची संख्याही वाढत आहे. देशातील 82 हजार 369 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 47.40 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण घटून 50.26 टक्के झाले आहे.

देशातील कोरोना बाधितांची संख्या पावणेदोन लाखांच्या जवळपास पोहचली असून, आत्तापर्यंत 82 हजार पेक्षा जास्त लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर अजून 86 हजार पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या एका दिवसात 265 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर देशात 4 हजार 971 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना मृत्यूदर 2.86 टक्के इतका आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या निकाली निघालेल्या 87 हजार 340 प्रकरणांपैकी 94.21 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून उर्वरित 5.69 टक्के प्रकरणांमध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 62,228 रूग्णांची नोंद झाली असून त्याखालोखाल तमिळनाडू मध्ये 20,246 रुग्ण आढळून आले आहेत, तसेच दिल्ली 17,386 आणि गुजरात मध्ये 15,934 रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून देशवासीयांना संदेश दिला आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी यांनी कोरोनामुळे कित्येक स्थलांतरितांना हाल आपेष्टा सहन कराव्या लागल्या, मात्र कोणतेही संकट किंवा कठीण परिस्थिती आपल्या भविष्याचा निर्णय करू शकत नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.